व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना अमानुष मारहाण; कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातली संतापजनक घटना
कृषिमंत्री दादा भुसे यांच्या गावात शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना चक्क व्यापाऱ्यांनी मारहाण केली आहे. मालेगाव बाजार समितीतल्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.
नाशिकः कृषिमंत्री दादा भुसे यांच्या गावात शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी चक्क अमानुष मारहाण केली आहे. मालेगाव बाजार समितीतल्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.
कृषिमंत्री दादा भुसे यांचे गाव म्हणून सध्या तरी मालेगावची विशेष ओळख आहे. कृषिमंत्र्यांचा मुक्कामही हल्ली मालेगावात असतो. कुठलाही पाहणी दौरा असो की, इतर बैठका. याचे आदेशही ते मालेगावातून काढताना दिसतात. याच मालेगावमध्ये माल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी चक्क अमानुष मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. त्याचे झाले असे की, दिलीप पवार आणि ताजमल पवार हे शेतकरी मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकायला आले होते. मात्र, त्यांचे तिथल्या व्यापाऱ्यांशी खटके उडाले. त्याचे रूपांतर वादावादीत झाले आणि शेवटी पर्यवसन हाणामारीत झाले. या घटनेत व्यापाऱ्यांनी दिलीप आणि ताजमल यांना मारहाण केली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना नोटीस काढून खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.
येवल्यातही व्यापाऱ्यांची दादागिरी
येवला तालुक्यातही व्यापाऱ्यांच्या दादागिरीला शेतकरी कंटाळले आहेत. ममदापूर येथील कांदा उत्पादक तरुण शेतकरी अक्षय गुडघे या शेतकऱ्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या ट्रॅक्टर मधून 20-22 क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. अंदाजे 35 ते 40 हजार रुपये इतके कांदा विक्री नंतर पैसे मिळणार असल्याने शेती उपयोगी अवजारे घेण्यासाठी या रक्कमेचा वापर करण्याचा अक्षयचा मानस होता. या रकमेची अत्यंत गरज आहे त्यामुळे रोख स्वरूपात ही रक्कम आजच मिळावी, अशी मागणी अक्षय गुडघे याने केली. शेतकऱ्याच्या या मागणीमुळे रागावलेल्या कांदा व्यापारी व कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती.
24 तासांच्या आता पैसे देण्याच्या नियमाला हरताळ
बाजार समितीत शेतीमालाच्या लिलावानंतर 24 तासांच्या आत रोख स्वरूपात शेतीमालाची रक्कम अदा करणे हा नियम आहे. मात्र, शेतकऱ्यांना शेती मालाचे पैसे पंधरा दिवसांनी दिली जात असल्याचा हा शेतकरी आरोप करत आहेत. त्यामुळे व्यापारी कशा पध्दतीने बाजार समितीच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. मुजोर कांदा व्यापाऱ्यांचे परवाने चौकशी करून रद्द होणार का हा प्रश्न यानिमिताने उपस्थित केला जातो.
इतर बातम्याः
भूमाफिया रम्मीला बेड्या; नाशिकमधल्या आनंदवली खून प्रकरणी कारवाई, 30 लाख रुपये 10 गुंठे जमिनीची होती सुपारीhttps://t.co/4rdONPNEur#Nashik|#Anandwalimurdercase|#farmersmurder|#landmafiarummy
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021