नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलणं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चांगलंच भोवणार असल्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून राऊत आता या प्रकरणावर काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. भादंविच्या कलम 500 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आता राऊत यांच्यावर काय पुढील कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊत आपल्या खास शैलीत त्याचा कसा समाचार घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आला असून दोन्ही गटातील तणाव वाढला आहे. निकालानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध जोरदार टीका केली जात आहेत. त्याचवेळी राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शाह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध. पानी का पानी केले, असं विधान अमित शाह यांनी केलं होतं. शाह यांचं हे विधान ठाकरे गटाच्या जिव्हारी लागलं आणि वाद सुरू झाला होता.
शाह यांच्या विधानानंतर पलटवार करताना राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.