नाशिकमध्ये सोने 47200 वर, चांदीच्या गणेश मूर्तीला मागणी
नाशिकमध्ये (NashikGold) 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर गुरुवारी (9 सप्टेंबर) 47200 वर आहेत. सध्या गणेशोत्सव सुरू झाला असून, चांदीच्या गणेश मूर्तीची (SilverGanesha) भाविकांकडून मागणी वाढल्याचे सराफा असोसिएशनचे (NashikSarafa) अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठी बोलताना सांगितले.
नाशिकः नाशिकमध्ये (NashikGold) 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर गुरुवारी (9 सप्टेंबर) 47200 वर आहेत. सध्या गणेशोत्सव सुरू झाला असून, चांदीच्या गणेश मूर्तीची (SilverGanesha)भाविकांकडून मागणी वाढल्याचे सराफा असोसिएशनचे (NashikSarafa) अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठी बोलताना सांगितले.
सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. इतक्या दिवस कोरोनाने सामान्यांना जेरीस आणले. अजूनही तिसऱ्या लाटेची भीती असली, तर सध्या रुग्ण कमी आहेत. त्यामुळे बाजारातही उत्साह पाहायला मिळतो आहे. नाशिकच्या सराफा बाजारामध्ये गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,200 आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46,000 आहेत. या दरावर अतिरिक्त जीएसटी असेल. सराफ्यात चांदीच्या दागिन्यांनाही मागणी वाढली आहे. नाशकात गुरुवारी चांदीचे किलोमागचे दर 64,500 असून, यावर अतिरिक्त जीएसटी असेल.
गेल्या महिन्यापेक्षा स्वस्त
नाशकात गेल्या महिन्यात 1 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर हे 48,390 होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 47,390 होते. या तुलनेत सप्टेंबरमध्ये या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळते. आता गणेशोत्सवाने सराफा बाजारातही उत्साहाचे वातावरण आले असून, नागरिकांची सराफा दुकानामधील वर्दळ वाढली आहे. महालक्ष्मी, नवरात्रोत्सव आणि विशेषतः दसरा आणि दिवाळीच्या पाडव्याला मोठी सोने खरेदी होण्याची शक्यता आहे. अनेक ग्राहक शुभ मुहूर्त पाहून सोन्याची आगावू मागणी नोंदवतात आणि त्या दिवशी सोन्याची खरेदी करतात.
चांदीच्या गणेश मूर्ती
सध्या सराफा बाजारात चांदीच्या गणेश मूर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. गणेशोत्सव सुरू असल्याने अनेक भाविक चांदीच्या गणेश मूर्तीची खरेदी करायला प्राधान्य देत आहेत. ही गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून कायमस्वरूपी घरात ठेवली जाते. नाशिक चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. चांदीची वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
महालक्ष्मीचे दागिने
गणेशोत्सवाच्या काळात महालक्ष्मीचा सणही येतो. त्याचीही सराफा बाजारात तयारी करण्यात आली आहे. महालक्ष्मीसाठी खास दागिने आले आहेत. त्यात अगदी नथ, कानातले, मंगळसूत्र यांचा समावेश आहे. या दागिन्यांनाही चांगली मागणी होताना दिसते आहे.
उद्या सराफा बंद
नाशकातील सराफा व्यापार शुक्रवारी बंद राहणार आहे. बाप्पांची प्राणप्रतिष्ठा असल्याने सराफा बाजाराला सुट्टी राहणार आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी गुरुवारी सकाळपासूनच खरेदीसाठी सराफा बाजाराकडे पावले वळवली आहेत.
गणेशोत्सवामुळे सराफा बाजारात उत्साह आला आहे. सध्या सोने आणि चांदीचे भाव स्थिर आहेत. ऑगस्ट महिन्यापेक्षा सध्याचे दर निश्चितच कमी झाले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,200 आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46,000 आहेत. – गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, नाशिक (Gold at 47200 in Nashik, demand for silver Ganesha idol)
इतर बातम्याः
मिठाईत भेसळ केल्यास दहा लाखांचा दंड, पाच वर्षांचा कारावास
काळजाचा ढोल, श्वासाच्या झांजा; नाशकात फेटेधारी दगडू शेट यांच्या मूर्तीला तुफान मागणी