खरंच तसं घडणार?; संजय राऊत यांना सल्ला काय?; गुलाबराव पाटील यांची बेधडक उत्तरे
यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांचा नवीन वर्षाचा संकल्पही जाहीर केला. सरकारच्या माध्यमातून शेतकरी आणि वेगवेगळ्या घटकांसाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत, त्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा नवीन वर्षाचा संकल्प आहे. येणारं वर्ष हे रामलल्लाचं वर्ष आहे. या नवीन वर्षामध्ये रामलल्ला येत आहेत. त्याबरोबरच पुढचा काळ सुद्धा रामराज्य देशात असावं ही नवीन वर्षाचे मनोकामना आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 31 डिसेंबर 2023 : येत्या 10 जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येणार आहे. या निकालावरच एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. हा निकाल काय लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय निर्णय देणार हे सुद्धा सांगणं कठिण आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे. त्यामुळे कुणाच्या पारड्यात अध्यक्ष कौल देतात याकडे लक्ष लागलेलं असतानाच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान करून चर्चेला तोंड फोडलं आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांना शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विचारण्यात आलं. अपात्रता प्रकरणात निकाल तुमच्या बाजूने लागेल का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहतील का? असा थेट सवाल गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर गुलाबराव पाटील यांनीही बेधडक उत्तर दिलं. अपात्रता प्रकरणात काहीच होणार नाहीये. या सर्व वावड्या आहेत. राम लल्लाच्या कृपेने आम्ही सत्तेत राहणार आहोत, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आमचीच सत्ता येईल
पुढील वर्षे निवडणुकीचं आहे. तुम्ही पुन्हा लढणार आहात. पण यंदा शिवसेनेत फूट पडलेली आहे, त्यामुळे निवडणुकीत पुन्हा निवडून येणार का? काय वाटतं?, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, आम्ही आमचा रस्ता चुकलो होतो. हिंदुत्वाच्या विचारावर भाजप-शिवसेनेची युती होती. तीच युती आम्ही आता पुढे नेली आहे. आम्ही पुन्हा आमच्या मार्गावर आलो आहोत. देशाचा आणि राज्यातील जनतेचा कल पाहिला तर नवीन वर्षात महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा भगवा फडकेल. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप या तिन्ही पक्षाच्या महायुतीचाच विजय होईल, अशी मला खात्री आहे, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
आमचा जनतेशी संपर्क
निवडणुकीत लोकांसमोर कसं जाणार? या प्रश्वावरही त्यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. विरोधकांनी किती टीका केली तरी काम करत राहा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितलं आहे. त्या माध्यमातून मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. जनतेशा आमचा जनसंपर्क आहे. त्या जनसंपर्काच्या बळावर आणि केलेल्या विकास कामांच्या जोरावर तसेच लोकांशी आम्ही जुळून आहोत. आमच्यामध्ये अहंपणा नाही. या सर्व मुद्द्यांच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या भक्कम नेतृत्वामुळे निवडणूक जिंकणार आहोत, असंही ते म्हणाले.
अबकी बार 400 पार
45 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे. या दाव्यात कितपत तथ्य आहे. मतदार महायुतीच्या बाजूने आहेत असं वाटतं का? असा सवाल करताच अबकी बार 400 पार होणारच. देशात तसं चित्रच आहे, असा दावा त्यांनी केला.
राऊत, तोंडाला आवर घाला
यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांना नवीन वर्षाचा सल्ला दिला. संजय राऊत आता तरी शांत व्हा. जे बाळासाहेब ठाकरे यांचा स्वप्न होतं, ते स्वप्न अयोध्येत राम मंदिर होत असल्याने पूर्ण होत आहे. रामलल्लाकडे बघून नतमस्तक व्हावं. तोंडाला चांगल्या पद्धतीने आवर घाला, उद्धव ठाकरे यांना फसवू नका, हीच अपेक्षा आहे, असा टोला लगावत पाटील यांनी राऊत यांना सल्ला दिला.