भिंत खचली, चूल विझलीः नाशिक जिल्ह्यात हाहाकार, दोघांचा बुडून मृत्यू; 3 हजार हेक्टरवरले पीक आडवे, गोदावरीला येणार महापूर
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, मालेगावमध्ये तब्बल 3 हजार हेक्टरवले पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.
नाशिकः गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, मालेगावमध्ये तब्बल 3 हजार हेक्टरवले पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. (Heavy rains in Nashik district, both drowned; Crop damage on 3 thousand hectares)
नाशिकमध्ये पावसाचे थैमान थांबता थांबत नाही. मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस अजूनही बरसत आहे. नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, कळवणला धुवाधार पावसाने झोडपेल आहे. नद्या-नाले दुथडी भरले आहेत. नांदगावमध्ये पांझण नदीच्या पुलावरून नीलेश परदेशी (वय 31) हा तरुण वाहून गेला आहे. तालुक्यातील बोलठाणसह इतर गावांचा पाण्यामुळे संपर्क तुटला आहे. दिंडोरीतील गणेश गुंबाडे (वय 22) या तरुणाचा पालखेडच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. शेतातल्या टोमॅटोवर फवारणी केल्यानंतर गणेश अंघोळीसाठी कालव्यात उतरला. कालव्यातून बाहेर निघताना लोखंडी रॉडचा धक्का लागल्याने तो पुन्हा कालव्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
नांदगावला 243 मिमीची नोंद
नांदगावला मंगळवारी दिवसभरात 243 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. येवल्यात 76 मिमी पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पाणी शिरले. मनमाडला पांझण आणि रामगुळणा नद्यांना पूर आला आहे. मनमाडची जीवनवाहिणी असणारे वाघदर्डी धरण भरले आहे. निफाड तालुक्यातील उगाव, शिवडी, खेडे परिसरात द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.
मालेगावला झोडपले
मालेगावमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तब्बल सहा गावांमधील तीन हजार हेक्टरवरील पीक उद्धवस्त झाले असून, त्याचा जवळपास 5 हजार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला असून, लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
डॉक्टर, कर्मचारी गच्चीवर अडकले
लासगावमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसाने पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पाणी घुसले. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी गच्चीवर आश्रय घेतला, तर आठ रुग्णांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या पावसाने परिसरातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, मका, सोयाबीन, भुईमूग हातचा गेला आहे.
गोदावरीला येणार महापूर
नाशिकमध्ये 13 सप्टेंबर रोजी गोदावरीला पहिला पूर आला होता. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा पूर आला. काल सोमवारी पुन्हा एकदा गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्याने वर्षातला तिसरा पूर गोदावरीला आला. सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून तो 15000 क्यूसेक पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Heavy rains in Nashik district, both drowned; Crop damage on 3 thousand hectares)
इतर बातम्याः
भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदार कांदेंना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी
थापड्याने गुंतवणूकदारांना घातला 64 लाखांचा गंडा; नाशिकमध्ये 13 जणांची फसवणूक