Sahitya Sammelan: साहित्य संमेलनाला हिंडता-फिरता अध्यक्ष असावा; कौतिकराव ठाले-पाटलांच्या सूचना
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाला गैरहजर राहिले. त्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक: अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाला गैरहजर राहिले. त्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापुढचा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हिंडता-फिरता असला पाहिजे, अशी सूचना कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली.
कौतिकराव ठाले-पाटील यांनी साहित्य महामंडळाची भूमिका मांडताना ही नाराजी व्यक्त केली. मला डॉक्टर नारळीकरांना दोष द्यायचा नाही. देणारही नाही. माझी इच्छाही नाही. नारळीकर सुद्धा या उद्घघाटनापुरते यायला हवे होते. त्यांना येण्यासाठीची सर्व व्यवस्था स्वागत मंडळ करण्यासाठी तयार असतानाही ते आले नाही. ते आले असते, तासभर बसले असते तर रसिकांनाही प्रचंड आनंद झाला असता. ते न आल्याने नाही म्हटलं तरी एक वेगळी किनार या उद्घाटन सोहळ्याला लागली आहे. साहित्य महामंडळाला पुन्हा आपला अध्यक्ष निवडावा यासाठी घटना बदलावी लागेल किंवा त्याचा विचार करावा लागेल. नाही तर पुढच्या संमेलनातही अशी वेळ येऊ शकते, असं सांगतानाच लोक राबतात, निधी जमा करतात आपला वेळ खर्च करतात आणि ऐनवेळेला असं काही घडलं तर संमेलन अडचणीत येतं. त्यामुळे या पुढे असं व्हायचं नसेल, होऊ द्यायचं नसेल तर अतिशय जागरूकपणे अध्यक्ष निवडला गेला पाहिजे. निदान हिंडता-फिरता अध्यक्ष निवडला गेला पाहिजे असं माझं मत आहे. या दृष्टीने महामंडळ विचार करेल अशी अपेक्षा आहे, असं ठाले-पाटील म्हणाले.
नारळीकरांनी कल्पना दिली नाही
जयंत नारळीकर यांनी व्हिडिओ कॉन्फिरन्सिंगद्वारे भाषण केलं. त्यांचं भाषण सुरू असताना रसिक बाहरे पडत होते. संमेलनाध्यक्ष येणार नसल्याचं माहीत नव्हतं. त्यांनी तशी पूर्व कल्पना दिली नाही. आपल्या नावावर हे साहित्य संमेलन होत आहे. तरीही अध्यक्ष येत नसेल तर महामंडळाने अतिशय जागरूकपणे अध्यक्ष निवडला पाहिजे. निदान हिंडता फिरता अध्यक्ष निवडला पाहिजे ही माझी भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं.
फादर व्हिलचेअरवर बसून आले
जयंत नारळीकर आले असते तर खूप बरे झाले असते. साहित्य महामंडळाने तीन वर्षापूर्वी घटना बदलली. पहिलं संमेलन निर्विघ्न पार पडलं. पहिल्या संमेलनात अडथळे आले. पण अध्यक्षांमुळे आले नव्हते. नव्या घटनेनुसार जे अध्यक्ष निवडले. त्यांची प्रकृती अस्वस्थतेमुळे ही संमेलने तशी अडचणीत आली होती. उस्मानाबादच्या साहित्य संमेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड केली. त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. सत्कार होईपर्यंत त्यांची प्रकृती उत्तम होती. साहित्य संमेलन दोन तीन दिवसांवर आल्यावर आणि त्यांच्या पाठीच्या कणाच्या मणक्यात मोठं अंतर आल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांच्या पाठीत वेदना होत होत्या. ते चालू शकत नव्हते. डॉक्टरांनी त्यांना जाण्यास मनाई केली. तरीही फादर रेल्वेतून प्रवास करून आले. त्यांना उस्मानाबादेत रेल्वेतून उतरता येत नव्हते. त्यांना व्हिलचेअरवर बसवून साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आणलं. व्हिलचेअरवरूनच त्यांनी 50 मिनिटं भाषण केलं. आपल्यामुळे स्वागत मंडळाला लाखो रुपये खर्च करावे लागले. अनेक लोक आपल्यासाठी आले आहेत. महामंडळाची गैरसोय होणार आहे. हे जाणून सर्व त्रास सहन करत ते आले, असं त्यांनी सांगितलं.
संमेलन वेठीस धरलं याचा खेद
तरुण साहित्यिकांना बोलत करणं हा साहित्य संमेलनाचा प्रयत्न आहे. समाज स्थितीशील राहिला नाही गतिशील झाला आहे. हळूवार का होईना बदल होत आहे हा बदल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या साहित्यिक मेजवाणीचा लाभ नागरिकांना घ्यावा, विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नाशिकचं संमेलन इतकं वेठीस धरलं गेलं त्याचा मला खेद वाटतो. आपल्याला असलेल्या प्रश्नांची उत्तरे चर्चेतून मिळू शकतात. त्यामुळे वादविवाद टाळावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
संबंधित बातम्या: