लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (6 जुलै) लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत (Lieutenant General Madhuri Kanitkar appointed as Vice Chancellor of the University of Health Sciences Nashik).
कोण आहेत माधुरी कानिटकर?
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1960 रोजी झाला. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी बालरोगशास्त्र या विषयात एमडी पदवी प्राप्त केली. त्यांनी 2017 ते 2019 या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले. त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण 22 वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 2008 साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार 10 फेब्रुवारी 2021 रोजी पूर्ण झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या. कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती.
दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया व राज्याच्या वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय हे समितीचे सदस्य होते.
हेही वाचा :
इगतपुरीतील रेव्ह पार्टी प्रकरण, 5 आरोपींना जामीन 20 जणांचा जामीन अर्ज फेटाळला, हीना पांचाळचं काय झालं?
नैसर्गिक नाले बुजवल्यावरुन मनसेचे माजी आमदार आक्रमक, नाशिक महापालिकेत धरणे आंदोलन
भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन, नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक, लोकशाही वाचवा दिवस पाळण्याचा इशारा
व्हिडीओ पाहा :
Lieutenant General Madhuri Kanitkar appointed as Vice Chancellor of the University of Health Sciences Nashik