‘सामना पेपर हा फक्त आता पुसायच्या कामाचा राहिला’, भाजपा नेत्याचे बोचणारे शब्द
"90% शिवसेना आमच्या सोबत आहे, त्यामुळे ते काय बोलत आहे कळत नाही. कालच्या भाषेवरून मला वाटलं त्यांची मनस्थिती चांगली नाही. आमच्याकडे बोलण्यासाठी दहा गोष्टी आम्ही बोलू शकतो" असं भाजपा नेत्याने म्हटलं आहे.
नाशिक (चैतन्य गायकवाड) : “उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त दोन-चार लोक राहिले आहेत. तो विषय वेगळा आहे. देवेंद्रजींबद्दल उद्धव ठाकरे बोलत होते, तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन आल्यानं ते असं बोलत आहेत. त्यांच्यामागे कोणी राहिलं नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत. आम्हाला त्यांचं शारीरिक व्यंग काढायचं नाही. पंतप्रधान यांच्यावर त्यांनी काय बोलावं?. विरोधी पक्षात आहे म्हणून त्यांना बोलावं लागतं. पण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? विश्वासार्हता असायला पाहिजे ? मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले ?” अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. “संजय राऊत हे लोकांना उसकवायला लागले आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरे अतिशय बालीश स्टेटमेंट करत आहेत. त्यांनाच काही घडवून तर आणायचं नाही ना?. याची चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी यांनाच ताब्यात घेतलं पाहिजे” असं गिरीश महाजन म्हणाले.
सातारा येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन म्हणाले की, “राज्यात कुणाला अस्थिरता माजवायची आहे ? कुणाला दंगली घडवायच्या आहेत ?. याची चौकशी झाली पाहिजे” “जाणीवपूर्वक अस्थिरता कोण निर्माण करतय? कोण खतपाणी घालत आहे, याचीही चौकशी पोलीस करत आहेत” असं गिरीश महाजन म्हणाले. “शिवसेनेत कोणी राहिले नाही. एक-दोन महिने थांबा, अजून कोणीही राहणार नाही. मुख्यमंत्री असताना कुणालाही वेळ दिला नाही. दादागिरी केली. घरात बसून कारभार केला. त्यामुळे सगळे जण त्यांच्यावर नाराज होते” असं गिरीश महाजन म्हणाले.
‘त्यांची मनस्थिती चांगली नाही’
“25 वर्षे यांनी काय, बाळासाहेबांनी कमळाबाईची पालखी वाहिली का ? . तुमची स्वतःची पालखी वाहण्यासाठी तुम्हाला चार भोये सुद्धा मिळत नाही. 90% शिवसेना आमच्या सोबत आहे त्यामुळे ते काय बोलत आहे कळत नाही. कालच्या भाषेवरून मला वाटलं त्यांची मनस्थिती चांगली नाही. आमच्याकडे बोलण्यासाठी दहा गोष्टी आम्ही बोलू शकतो. शारीरिक व्यंगावर हा असा दिसतो तो तसा दिसतो आम्हीही बोलू शकतो” असं गिरीश महाजन म्हणाले. ’48 पैकी एक खासदार निवडून आणून दाखवा’
“सामना पेपर हा फक्त आता पुसायच्या कामाचा राहिला आहे. त्याला महत्त्व देऊ नका. 48 पैकी एक खासदार निवडून आणून दाखवा. राऊत साहेबांनी सुरक्षित मतदार संघ शोधून निवडून येऊन दाखवावे” असं आव्हान गिरीश महाजन यांनी केलं.