देवेंद्रजींना शिव्या घालणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार; गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
लोकसभेत का कमी पडलो याची कारण शोधून काढा. आपल्याकडे खंबीर नेतृत्व आहे. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही देखील कुठे कमी पडणार नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. लाडकी बहिण योजना लोकांपर्यंत पोहोचवा. राजकीय फायदा घ्यायचा आहे. पण या योजनेमुळे भगिनी तुमच्याशी जोडल्या जातील. गरिबी हटावचे आतापर्यंत फक्त नारे दिले गेले. गरिबी फक्त आम्ही हटवली, असंही ते म्हणाले.
एक तर तू राहीन किंवा मी राहील, असा निर्वाणीचा इशाराच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. आजही उद्धव ठाकरे यांनी या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्याविरोधात जेवढं बोलाल तेवढं ते पुढे जातील, असंही गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
देवेंद्रजींनी झपाट्याने काम केलं. म्हणून त्यांना बदनाम करण्याचं काम केले. किती खालच्या थराला जात आहात. सकाळ झाली की देवेंद्रजीच दिसतात. एवढंच काम उरलं आहे. ते जेवढ्या शिव्या घालतील तेवढे देवेंद्रजी पुढे जातील. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. कितीही शिव्या दिल्या तरी फरक पडणार नाही. पुढचा काळ आपलाच आहे, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले.
महाजनांचा संताप
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घरात बसले. कोरोना संकट असताना उद्धव ठाकरे यांनी एकाही हॉस्पिटलला भेट दिली नाही. आता खालच्या थराचे आरोप करत आहेत. किती अर्वाच्च भाषेत बोलावं याला काही लिमिट राहिली नाही. संजय राऊत तर शिवीगाळ शिवाय बोलतच नाही, असा संताप महाजन यांनी व्यक्त केला.
झपाट्याने कामाला लागा
परवा उद्धव ठाकरे म्हणाले, तू राहशील नाही तर मी. हा काय कुस्तीचा आखाडा आहे का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही आमची पातळी सोडणार नाही. जनता सगळ बघते आहे. जनता यांना जागा दाखवेल. आम्ही 2 खासदारांवरून 302 वर आलो आहोत. नाराज होण्याची गरज नाही. पुन्हा जोमाने कामाला लागा, असं आवाहन त्यांनी केलं.
नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी
लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे. गेल्या वेळी आम्ही सगळ्या जागा जिंकल्या होत्या. मी म्हणालो होतो, आपण सगळ्या जागा जिंकू. पण वेळेवर परिस्थिती बदलली. त्याची कारण वेगवेगळी आहेत. अनेकांचे मत वेगवेगळे आहे. पण नरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी ठरले, असं गिरीश महाजन म्हणाले.