नाशिक : “माझी मम्मी क्लीअर झाली होती. फार चांगली होती. जेवण करत होती. अर्ध्या तासापूर्वी ऑक्सिजन संपला. व्हेंटिलेटर बंद. फडफड कोंबडीवाणी मेली ती फडफडून. कुणी नाही आलं तिच्याजवळ, मरुन गेली. फक्त माझी मम्मीच नाही. सगळे मेले. पूर्ण वार्डचे लोकं मेले”, असं जीवाच्या आकांताने आक्रोश करुन एक महिला झाकीर हुसेन रुग्णालयाबाहेर सांगत होती. नाशिकच्या झाकीर रुग्णालयात (Nashik Zakir Hussain Hospital) ऑक्सिजनचा टँकर लीक झाला. त्यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे तब्बल 22 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाला (Oxygen tanker leaked at DR Jhakhir Husaain hospital).
रुग्णालय प्रशासनाच्या वागणुकीवरही महिलेचा आक्रोश
या दुर्घटनेनंतर मृतकांच्या डोळ्यांमधील पाणी, चेहऱ्यावरील हवालदिलता आणि आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा आहे. “दोन-दोन दिवस लोक वेटिंगवर ठेवतात. हे हॉटेल आहे का की वेटिंगवर ठेवता? दोन दिवस माझी मम्मी वेटिंगवर होती. तेव्हा हॉस्पिटलने रजिस्ट्रेशन केलं. त्यानंतर त्यांनी अॅडमीट केलं. वेटिंगवर ठेवतात हे, हे काही हॉटले आहे? दोन दिवस वेटिंगवर राहा, मग आम्ही तुमचं प्रोसेजर करु, जसं आम्ही यांच्याकडे नोकरी मागत आहोत”, अशा शब्दात महिलेने आक्रोश व्यक्त केला (Oxygen tanker leaked at DR Jhakhir Husaain hospital).
रुग्णालयाबाहेर मृत नातेवाईकांचा आक्रोशाचा आवाज हृदय पिळवटून टाकणारा आहे. अशावेळी बाधित कुटुंबांना सावरायचं कसं? त्यांच्या डोळ्यांमधील अश्रू पुसायचे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
खूप मेहनत करुन ऑक्सिजन बेड मिळतो, पण…
संपूर्ण शहर पिंजून काढल्यानंतर रुग्णांना कुठेतरी ऑक्सिजनचा बेड मिळाला होता. आता ऑक्सिजनचा बेड मिळाल्यानंतर आपला रुग्ण हा बरा होऊन घरी येणार, अशी आशा नातेवाईकांना होती. आपला रुग्ण बरा व्हावा म्हणून काही लोकांनी दर्ग्यावर चादर चढवलेली, काही जणांनी नवस केला होता. पण अशा दुर्घटनेत लोक तडफडून मरत आहेत. याहून भयानक दृश्य महामारीचं दिसणार नाही. अजूनही लोक सकारात्मक आहे. त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल, अशी आशा आहे. मात्र, असं असाताना अशी काहीशी मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.
नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. या टँकरमधील व्हॉल लीक झाल्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे स्थानिक प्रशासनाने कळवल आहे, असेही ते म्हणाले.
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जवळपास एक दीड तासाने ही ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Nashik Oxygen Tank Leak)
नाशिकमधील दुर्घटनेची माहिती सांगणारा व्हिडीओ :
संबंधित व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत: राजेश टोपे