नाशिक : गेल्या सहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) झाला. या पावसामुळे अनेक नद्यांना पूर (Flood) आला आणि नागरिकांच्या घरामध्ये थेट पावसाचे पाणी घुसले. इतकेच नाही तर पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसलायं. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराचा नांदूर मधमेश्वर धरणाच्या बॅक वॉटरला (Back water) असलेल्या निफाड तालुक्यातील गोदाकाट परिसरात असलेल्या गावातील शेती पिकांना फटका बसला. पावसामध्ये अख्ख्ये पिक वाहून गेल्याने शेतकरी राजा मोठ्या चिंतेत आहे.
नाशिकच्या पश्चिमेकडील त्रंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात पावसाने सहा दिवस जोरदार बॅटिंग केल्यामुळे दारणा आणि गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चापडगाव, भुसे आणि करंजगाव या गावातील नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतामध्ये पाणी शिरल्याने कांदा, ऊस, सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग, मूग इत्यादी शेती पिके पाण्यातच आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचे विसर्ग येणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजनबद्ध केले असते तर शेतीचे नुकसान झाले नसते. योग्य नियोजन केल्यास शेतीचे नुकसान टाळता येईल याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आणि झालेले शेतीचे नुकसान भरपाई शासनाने करून द्यावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.