‘सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान’, माणिकराव शिंदे यांचा भुजबळांना खोचक टोला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माणिकराव शिदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान आहे, असं माणिकराव शिंदे म्हणाले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार हिरामण खोसकर यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अजित पवार छगन भुजबळ यांना योग्य संधी नक्की देतील, असं हिरामण खोसकर म्हणाले आहेत. तसेच अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी एकत्र यावं, अशी आपण विनंती करणार असल्याचं देखील खोसकर म्हणाले आहेत.
माजी मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माणिकराव शिंदे यांनी आज मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे यांच्यात येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात थेट लढत झाली होती. माणिकराव शिंदे हे आता मंत्री माणिकराव कोकाटे यांचा येवल्यात नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करणार आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या भेटीनंतर माणिकराव शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.
“माझ्या हातून पराभूत होण्यापेक्षा राज्यामध्ये सत्ता येऊन त्यांना मंत्रिपद न जाणं याला जास्त नियतीने महत्व दिलं. ते दुसऱ्या माणिकरावच्या हातून घडलं असावं, असं वाटतं. हे राजकारण काही नाही. मंत्री झाल्यानंतर राज्याचा मंत्री असतो. आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून एकमेकांच्या टचमध्ये आहोत. शुभेच्छा देणं हे महत्त्वाचं आहे. माणिकराव कोकाटे निश्चित पालकमंत्री झाले पाहिजेत. निश्चितपणे त्यांनाच करतील असं वाटतं”, अशी प्रतिक्रिया माणिकराव शिंदे यांनी दिली.
“नियतीला कदाचित सरकार येऊन सरकारमध्ये नसणे हा मोठा अपमान त्यांना द्यायचा होता म्हणून कदाचित येवल्यामध्ये त्यांना विजय मिळाला. त्याची लढत कशी झाली हे येवल्यातल्या जनतेला माहिती आहे. भाजपही छगन भुजबळ यांना घेईल का माहीत नाही. कारण ते सरस्वतीवर फार प्रेम करणारे, त्यांचे स्टेटमेंट्स आहेत”, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
हिरामण खोसकर काय म्हणाले?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनीदेखील याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “अजित दादा त्यांना कुठेतरी संधी देतील. आम्ही परवा जाणार आहोत, छगन भुजबळ यांना भेटणार आहोत. आम्ही अजित दादांची परवानगी घेतली आहे. छगन भुजबळ यांच्याकडे जाणार आहोत. दोन्ही मोठे नेते आमचं ऐकतील अशी आम्हाला खात्री आहे. दोन्ही नेत्यांनी परत एकत्र आले पाहिजे. केंद्रात संधी मिळाली तर केंद्राकडूनही निधी मिळेल. अडीच वर्ष राज्यात संधी नाही. मात्र तिथे नेतृत्व करू शकतात. छगन भुजबळ यांना सगळं माहिती आहे. आम्ही त्यांच्याएवढे मोठे नाहीत. आता कुठेतरी दुरावा झाला तो जवळ आणण्यासाठी गेलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया हिरामण खोसकर यांनी दिली.