राजीनाम्याचा खुलासा तब्बल अडीच महिन्यांनी का? छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. आपण नोव्हेंबर महिन्यातच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं भुजबळ म्हणाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अडीच महिन्यांपूर्वी राजीनामा दिला मग इतके दिवस त्याबाबत वाच्यता का केली नाही? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक | 4 जानेवारी 2024 : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर आक्षेप घेतल्यानंतर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. “मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना लात मारुन मंत्रिमंडळातून बाहेर काढावं”, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याला उत्तर देत असताना भुजबळांनी आपण 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला, असं मोठं वक्तव्य केलं. पण मंत्रिपदाचा राजीनामा दिला हे इतके दिवस जाहीरपणे का सांगितलं नाही? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत गौप्यस्फोट केला आहे. आपण राजीनामा दिल्यानंतर पडद्यामागे काय-काय घडलं होतं, याबाबत छगन भुजबळ यांनी खुलासा केला आहे.
“मी 17 तारखेला अंबडच्या जाहीर सभेला जाण्याअगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजित पवार यांच्या कार्यालयात दिला. मला अंबडला जाताना निरोप आला की, याबाबत वाच्यता करु नका. मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही. आल्यानंतर मख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं. मग अजित पवारांनी सांगितलं की, तुमचा राजीनामा मी मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणाले की, तुमचं ओबीसींच्या बाबतीत जे मतं आहे ते मांडायला आमचा विरोध नाही. ओबीसींसाठीदेखील आपण शांततेने काम केलं पाहिजे. कृपया या राजीनाम्याची वाच्यता करु नका. त्यामुळे मी तब्बल अडीच महिने राजीनाम्याची वाच्यता केली नाही”, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं.
‘मी ज्यावेळेला राजीनामा दिला तो जिवंत आहे’
“वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा द्या सांगत आहेत. शेवटी शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितलं की, याच्या कंबरेत लात घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा. त्यानंतर मग मी जो शब्द दिला होता की, मी वाच्यता करणार नाही. ती वाच्यता मी केली. कृपया तुम्ही असं समजू नका की, मी मंत्रिपदाला चिपकून बसतो. मी 16 तारखेला राजीनामा दिला आणि 17 तारखेला अंबडला सभेला गेलो. त्यांना बोलायला काय जातं की, नाटक आहे वगैरे. त्यांना बोलूद्या. मी आजही सांगतो. मी ज्यावेळेला राजीनामा दिला तो जिवंत आहे. तो त्यांच्याकडे आहे”, असं भुजबळ म्हणाले.
‘राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत तर मला काम करावंच लागेल’
“जोपर्यंत राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत तर मला काम करावंच लागेल. फाईल सुद्धा सह्या कराव्या लागतात. सरकारी लाभ म्हणजे काय असतो? मी माझ्या गाडीतून फिरतोय. माझ्या गाडीतून जातोय. माझ्या कार्यकर्त्यांच्या खर्चातून सभा होतेय. माझ्याकडे कोणता लाभ आहे? कुठल्या मंत्र्यांकडे कोणतं खातं आहे हे मुख्यमंत्री ठरवतात. कुणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात. त्याप्रमाणे ते राज्यपालांना कळवतात”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.