ठाकरे गटाचा हायकोर्टात पहिल्यांदाच मोठा विजय, शिंदे गटाला मोठा धक्का; काय आहे प्रकरण?

| Updated on: Jun 28, 2023 | 8:11 AM

राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर शिंदे गटाची सत्ता गेली नसली तरी कोर्टाच्या एका प्रकरणात ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण आहे.

ठाकरे गटाचा हायकोर्टात पहिल्यांदाच मोठा विजय, शिंदे गटाला मोठा धक्का; काय आहे प्रकरण?
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चैतन्य मनिषा अशोक, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालात कोर्टाने राज्यपालांपासून ते विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दिलासा देणारे निष्कर्षही काढले. पण राज्यातील सरकार गेलं नाही. त्यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि पक्ष चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाने राज्यातील महापालिकांमधील कार्यालये ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. युनियनची कार्यालयही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. ते प्रकरणही मुंबई उच्च न्यायालयात गेलं. या प्रकरणात ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिकमधील म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या लढाईत उद्धव ठाकरे गटाची सरशी झाली आहे. शिंदे गटाने म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयावर दावा सांगितला होता. त्यामुळे नाशिक पोलिसांनी या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं असता कोर्टाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला. या प्रकरणात शिंदे गटावर सरशी केल्यानंतर ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयाचं सील उघडलं जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गटातील वाद भडकू नये म्हणून तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या आदेशाने पोलिसांनी हे कार्यालय सील केले होते. म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे तत्कालीन अध्यक्ष प्रविण तिदमे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हा वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. दोन्ही गटांनी या कार्यालयावर आपलाच ताबा सांगितला होता. मात्र, या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईत शिंदे गटाला हार पत्करावी लागली आहे. त्यामूळे आता म्युनिसिपल कर्मचारी दालनाचा ताबा ठाकरे गटाकडे गेला आहे.

सगळीकडे परिस्थिती जैसे थे

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. या फुटीनंतर शिंदे गटाने पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला होता. निवडणूक आयोगाने या प्रकरणी शिंदे गटाला दिलासा दिला होता. शिंदे गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिलं होतं. त्यानंतर आम्हीच अधिकृत शिवसेना असल्याचं सांगत शिवसेनेच्या महापालिकांमधील कार्यालये आणि शिवसेनेच्या गावागावातील शाखांवर ताबा सांगायला सुरुवात केली होती. काही ठिकाणी या वादातून दोन गट आमनेसामनेही आले होते. त्यामुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.