नरहरी झिरवळ यांचं राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष चॅलेंज, पाहा नेमकं काय म्हणाले?
नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयात केलेल्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. त्यांनी आजदेखील झिरवळ यांच्या आंदोलनावर टीका केली. यानंतर नरहरी झिरवळ यांच्याकडून राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. धनगड दाखले रद्द करण्याच्या निर्णयावर झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली. आपण सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं झिरवळ म्हणाले आहेत. “आमच्यातील बोगस दाखले देखील रद्द करा, आमची मागणी होती. तेव्हा मात्र सरकारने हे आमच्या अधिकारात नसल्याचं सांगत हात झटकले होते. मग आता सरकारने हा निर्णय कसा घेतला?”, असा प्रश्न नरहरी झिरवळ यांनी उपस्थित केला. तसेच आपण उद्याच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि जाब विचारणार, असं झिरवळ यांनी सांगितलं. यावेळी नरहरी झिरवळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेलादेखील प्रत्युत्तर दिलं.
नरहरी झिरवळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे चॅलेंज दिलं आहे. “मी जाळी नसलेल्या ठिकाणी सुद्धा उडी मारू शकतो. मी आदिवासी आहे. जाळीवर उडी मारणाऱ्यांना कोणी सर्कस म्हणो किंवा तमाशा म्हणो पण माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला. ज्यांना प्रयोग करायचा असेल त्यांनी अजून डबल जाळी लावून उडी मारावी”, असं अप्रत्यक्ष आव्हान नरहरी झिरवळ यांनी राज ठाकरे यांना दिलं.
नरहरी झिरवळ यांना जीवे मारण्याची धमकी?
यावेळी नरहरी झिरवळ यांना जीवे मारण्याच्या धमकीबाबतही माहिती दिली. “धनगर आरक्षणाचा मुद्दा परत परत का घेतला जातो? याबाबत मी भाष्य केलं असताना हा जास्तच बोलतो असं म्हणून माझं तंगडं तोडण्याची धमकी देण्यात आली होती. झिरवळचं तंगडं तोडलं तर त्याला एक लाख रुपये देऊ अशी धमकी दिली होती. तो कोण होता? त्याचा तपास केला होता. मात्र मीच म्हणालो जाऊद्या. लाख रुपयाला कोंबड पण मिळतं. तक्रार देणे हे माझं काम नाही म्हणून मी तक्रार दिली नाही”, असं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं.
आदिवासींचा स्वतंत्र पक्ष काढण्याची गरज का नाही?
“गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या सामाजिक चळवळीत एकत्र काम करतो. आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र पक्ष असावा असं मधुकर पिचड यांना तेव्हा वाटलं होतं. आपल्या आमदारांना त्रास होतो असं मी त्यांना म्हणालो होतो. कधी कोर्टाच्या नावावर तर कधी वेळ नसतो म्हणून त्यांना टाळलं जातं. सरकारमध्ये असताना देखील टाळलं जातं. तेव्हा ते म्हणाले होते आदिवाशींचा पक्ष काढावा. आजही सर्वपक्षीय आदिवासी नेते सामाजिक प्रश्नांवर एकत्र येतात, म्हणून आजही स्वतंत्र आदिवासींचा पक्ष काढण्याची गरज नाही असे मी म्हणालो”, असं स्पष्टीकरण नरहरी झिरवळ यांनी दिलं.
“पेसा भरती प्रकरणी समोरचा कोर्टात जाईल आणि त्यामुळे पुन्हा वेळ जाईल, म्हणून कॅवेट दाखल करून ठेवणे योग्य आहे म्हणून ते करत आहोत. पुढच्या 1 तासात 400 हून अधिक शिक्षकांना पेसा अंतर्गत नियुक्ती मिळेल. माझा पाठपुरावा सुरू आहे”, असा दावा झिरवळ यांनी केला.