Maharashtra Bandh : नाशिक बाजार समितीमध्ये शुकशुकाट, कोट्यवधींची उलाढाल ठप्प; उद्योग आघाडी, शेतकरी संघटनेचा मात्र विरोध
उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये सोमवारी नाशिक बाजार समिती सहभागी झाली. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
नाशिकः उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये सोमवारी नाशिक बाजार समिती सहभागी झाली. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आक्रमक झाले आहे. त्यासाठी त्यांनी आज सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील बंदमध्ये सहभागी झाले आहेत. या बंदमध्ये सहभागी होण्याच्या निर्णय नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितीच्या बाहेर एक मोठा फलक लावून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाजप उद्योग आघाडीचा विरोध
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपच्या उद्योग आघाडीने विरोध केला आहे. उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे. दुकान बंद करण्यास बळजबरी झाली तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून गुन्हे दाखल करू, असा इशारा पेशकर यांनी दिला आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने जरूर आंदोलन करावे. मात्र, आधीच कोरोनाने व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. त्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना दबावाखाली न ठेवता व्यापार सुरू ठेवावा, असे आवाहन पेशकार यांनी केले आहे.
शेतकरी संघटनाही विरोधात
लखीमपूर हिंसाचाराविरोधात पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेनेही विरोध दर्शवला आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून शेतकऱ्यांचा राजकीय सोयीसाठी वापर केला जात आहे. हे भांडण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आहे. यात शेतकऱ्यांना सुळावर दिले जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले यांनी केला आहे.
इतर बातम्याः
आई राजा उदो उदो: सप्तश्रृंगी गडावर भक्तांचा मेळा; दर्शनासाठी ‘या’ पाच ठिकाणी मिळतायत ऑनलाइन पास!
Maharashtra Band | लोकशाही वाचवण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक : बाळासाहेब थोरातhttps://t.co/QVXenBKg2l#BalasahebThorat #MaharashtraBandh
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021