आई राजा उदो उदो, सप्तश्रृंगी देवीचा चैत्रोत्सव सुरू; लाखो भाविकांसाठी अनोखी पर्वणी!
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कडकडीत लॉकडाऊननंतर यंदा प्रथमच वणी येथे हा चैत्रोत्सव होतोय. यात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून किमान पाच लाख भाविक हजेरी लावतील अशी शक्यता आहे. या उत्सवासाठी खान्देशातून आलेल्या शेकड्या पालख्या गडाकडे रवाना झाल्या आहेत.
नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या (Wani) सप्तश्रृंगी देवीच्या (Saptashrungi Devi) चैत्रोत्सवाला आज रामनवमीपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहाटेपासून विविध धार्मिक पूजा-विधी करण्यात आले. सकाळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे व प्रमुख जिल्हा न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते सपत्नीक देवीची पूजा झाली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धन देसाई, नाशिकच्या जिल्हा न्यायालयाचे राजशिष्टाचार अधिकारी नितीन आरोटे, विश्वस्त अॅड. ललित निकम, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर आदींची उपस्थिती होती. सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवात भाविकांना मोफत महाप्रसाद मिळणार आहे. तसेच मंदिरही चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
शेकडो पालख्या रवाना
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कडकडीत लॉकडाऊननंतर यंदा प्रथमच हा उत्सव होतोय. यात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून किमान पाच लाख भाविक हजेरी लावतील अशी शक्यता आहे. या उत्सवासाठी खान्देशातून आलेल्या शेकड्या पालख्या गडाकडे रवाना झाल्या आहेत. गड परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे. त्यामुळे कुणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते. लाखो भाविकांचे सप्तश्रृंगी माता कुलदैवत आहे. प्रभू रामचंद्रापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी या स्थळाला भेट दिल्याचे म्हटले जाते.
गिरिजेचे रूप सप्तश्रृंगी…
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली. तिचे रूप म्हणजे सप्तश्रृंगी. देवीची मूर्ती स्वयंभू असून, ती आठ फूट उंच आहे. तिला अठराभुजा आहेत. मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत. शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते. असे म्हटले जाते की, चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते. शारदीय नवरात्रात गंभीर. निवृत्तीनाथ या मातेला आपली कुलस्वामिनी मानत. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गडावर ध्यान केल्याचे म्हटले जाते.
काय आहे आख्यायिका?
सप्तश्रृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे. येथे देवीने त्रिशुळाने महिषासुराच्या धडापासून शीर वेगळे केले. त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली. ती आजही दिसते, असे म्हणतात. या ठिकाणी महिषासुराच्या शीराचे पूजनही केले जाते. लीळाचरित्रातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. राम आणि रावणाचे युद्ध झाले. त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. त्याला लक्ष्मण शक्ती लागली. यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्याचा काही भाग जमिनीवर पडला. तो म्हणजे सप्तश्रृंगी, असे म्हटले जाते. राम-सीतेने वनवासात इथले दर्शन घेतले. छत्रपती शिवरायही या देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख बखरीमध्ये आढळतो.
सप्तश्रृंगी गडावर कसे पोहोचाल?
सप्तश्रृंगी गडावर हवाई मार्गे पोहचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ हे नाशिक येथील ओझरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ते शहराच्या मध्यभागीपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे. सप्तश्रृंगी गडापासून जवळचे जवळचे रेल्वे स्थानक नाशिकरोड असून, त्याचे अंतर 75 किमी आहे. तर रस्तामार्गे नाशिक ते सप्तश्रृंगी मंदिर हे अंतर 65 किलोमीटर आहे.