Nashik Corona| मुख्यमंत्र्यांच्या शिलेदारांकडूनच कोरोना नियमांची पायमल्ली; शिवसेनेच्या कार्यक्रमात नियमांचा फज्जा
नाशिकमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीच्या आणि कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यातही कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाले.
नाशिकः एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे पोटतिडकीने कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, असे आवाहन करताना आपल्याला टीव्हीवर दिसतात. मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे शिलेदार आणि शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्तेच या नियमांची पायमल्ली करण्यात आघाडीवर असल्याचे नाशिकमध्ये दिसत आहे. यांच्यावर कारवाई होणार का, असा सवाल यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
नेमके प्रकरण काय?
नाशिकमध्ये ‘शिवसेना मनामनात शिवबंधन घराघरात’ हा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करण्यात आली. कार्यक्रमात अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. हे कार्यक्रम 50 पेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडले. पोलिसांनाही यावेळी दुर्लक्ष केले. मग सरकार जे नियम जाहीर करते, त्यातून सत्ताधाऱ्यांना सूट असते का, या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
नियम काय सांगतो?
राज्यात 24 डिसेंबर रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने अतिरिक्त निर्बंध काय असतील, याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखीलउपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते. मात्र, या नियमांचा सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना विसर पडला.
यापूर्वीही असे प्रकार
नाशिकमध्ये नुकतेच दोन शाही विवाह सोहळे झाले. यात जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीचा एक विवाह सोहळा होता. या सोहळ्याला खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तर दुसरीककडे कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मुलाचा नाशिकमध्येच बालाजी लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला मंत्री एकनाथ शिंदे, आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना नेते संजय राऊत, दादा भुसे यांनी हजेरी लावली. या दोन्ही लग्नाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळीही कोरोनाच्या नियमांचेही उल्लंघन झाले.
काय कारवाई होणार?
नव्या ओमिक्रॉन विषाणूनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने नुकतेच नवी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, ही नियमावली तयार करण्यात ज्या सरकार नावाचा सहभाग असतो, त्या सरकारमधील आमदार आणि मंत्रीच जर नियमांचे पालन करत नसतील, तर इतरही हाच कित्ता गिरवणार ना. मग या संबंधितावर कारवाई करायला प्रशासन धजावणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
इतर बातम्याः
Omicron| नाशिकमध्ये 6 तर जिल्ह्यात 39 केंद्रांवर मुलांचे लसीकरण; सोमवारपासून होणार सुरुवात
Good news| नाशिक-शिर्डी अवघ्या दीड तासात; सिन्नर चौपदरी महामार्ग मार्चअखेर होणार खुला