Nashik Crime | नाशिकमध्ये बोगस जामीनदारांचे रॅकेट; 17 जणांविरोधात गुन्हा, प्रकरण काय?
नाशिक जिल्हा न्यायालय आवारात जामीन मिळवून देणाऱ्यांचे रॅकेटच सक्रिय असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. अशा जवळपास 17 संशयितांविरोधात न्यायालय प्रबंधक यांच्या तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकः नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयात तीन महिला बोगस डॉक्टर (Doctor) आढळल्यानंतर आता एक बोगस जामीनदारांचे रॅकेट उघड झाल्याने खळबळ उडालीय. या जामीनदारांनी अनेक आरोपांना जामीन मिळवून दिला आहे. अशा जवळपास 17 संशयितांविरोधात न्यायालय प्रबंधक यांच्या तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, काही ठराविक लोक बोगस कागदपत्रे, दस्तावेज आणि सतत वेगवेगळी नाव धारण करत जिल्हा न्यायालयात (Court) विविध प्रकरणात जामीनदार म्हणून उभे रहात होते. याची कुणकुण लागली. तेव्हा या प्रकरणाची अधिक माहिती घेतली. तेव्हा त्यात जावेद पिंजारी, राजू वाघमारे, इकबाल पिंजारी, लक्ष्मण खडताले, मधुकर जाधव, युवराज निकम हे पाच जण आणि त्यांच्या साथीदार महिलांनी अनेकांचा जामीनदार होत जामीन मिळवून दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
81 जणांना सहकार्य
जिल्हा न्यायालय आवारात जामीन मिळवून देणाऱ्यांचे रॅकेटच सक्रिय असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. त्यांनी आतापर्यंत विविध फौजदारी आणि इतर गुन्ह्यात जवळपास 81 जणांना जामीन मिळवून दिल्याचे समोर आले आहे. त्यात प्रत्येक जामीनासाठी ठराविक रक्कम आकारली जायची. न्यायालयाच्या पवित्र आवारात असा प्रकार सुरू होता. त्याची खबर पोलिसांनाही नव्हती, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कदाचित संशयितांची संख्या वाढू शकते, असा अंदाजही वर्तवला जात आहे.
आकडा वाढण्याची शक्यता
आतापर्यंत या संशयितांनी किती जणांना जामीन मिळवून दिला, याचा ठोक आकडा सध्या शंभरच्या घरात आहे. मात्र, ही संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. असे असेल तर हे प्रकरण गंभीर आहे. शिवाय यांचे इतर साथीदार कोण आहेत, न्यायालयाच्या आवारातील इतर वकील किंवा आणखी कोणाशी त्यांचे लागेबांधे आहेत का, याचा तपासही पोलिसांनी सुरू केल्याचे समजते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.