नाशिककरांना मोठा दिलासा; पंचवटी एक्स्प्रेसमध्ये 10 डबे जनरल, पासधारकांसाठीही महत्त्वाचा निर्णय
नोकरीसाठी मुंबई, मनमाड, अशा फेऱ्या करणाऱ्या हजारो नाशिककरांसाठी एक खूशखबर. होय, त्यांची एक अतिशय जुनी मागणी पूर्ण झाली आहे. आता मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये चक्क 20 पैकी 10 डबे जनरल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

नाशिकः नोकरीसाठी मुंबई, मनमाड, नाशिक (Nashik) अशा फेऱ्या करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खूशखबर. होय, त्यांची एक अतिशय जुनी मागणी पूर्ण झाली आहे. आता मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये (Panchavati Express) चक्क 20 पैकी 10 डबे जनरल (General) करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर सर्वसाधारण मासिक पासधारकांसाठी दोन डबे जोडण्यात आलेत. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळालाय. मनमाड येथून सकाळी 6 वाजता सुटणारी पंचवटी एक्स्प्रेस ही मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक, इगतपुरी यासह इतर गावांच्या प्रवाशांची लाइफलाइन मानली जाते. या गाडीतून रोज शेकडो सर्वसामान्य प्रवाशासोबत चाकरमानी प्रवास करतात. मात्र, कोविडमुळे इतर रेल्वेप्रमाणे ही गाडी बंद करण्यात आली होती. चार महिन्यांपूर्वी गाडी सुरू झाली. मात्र, चाकरमान्यांना मासिक पास दिले जात नव्हते. शिवाय सर्वसामान्य प्रवाशांना रिझर्व्हेशन करून प्रवास करावा लागत होता.
नाशिक-इगतपुरीला प्रतिसाद
नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेस (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) ही 8 डब्यांची रेल्वे जानेवारी महिन्यात सुरू झालीय. त्यामुळेही हजारो प्रवाशांना दिलासा मिळालाय. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सकाळी 7 वाजता मार्गस्थ होते. त्यानंतर 7.26 ला जळगाव, 10.09 वाजता चाळीसगाव, 12.08 वाजता मनमाड, 01.23 वाजता नाशिक आणि त्यानंतर साधारणतः दुपारी 3 सुमारास ही गाडी इगतपुरी येथे पोहचते. परतीच्या प्रवासात सकाळी सव्वानऊ वाजता ही गाडी इगतपुरी येथून निघते. तर भुसावळवला ही गाडी सायंकाळी 05.10 पोहचते. त्यामुळे या मार्गावरच्या प्रवाशांची चांगलीच सोय झालीय. या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
मेमू लोकल कधी?
नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे.
इतर बातम्याः