नाशिक महापालिकेची निवडणूक मे महिन्यात होण्याचा कयास; ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकलणार
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सोमवारी इम्पिरिकल डाटा मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकला, असा ठराव करण्यात आला. त्यामुळे महापालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे.
नाशिकः घोषणा होण्यापूर्वीच अतिशय चर्चेत असलेली, विविध राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेली, त्यासाठी वर्चस्व पणाला लावलेली नाशिक महापालिकेची निवडणूक मे महिन्याची होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सोमवारी इम्पिरिकल डाटा मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकला, असा ठराव करण्यात आला. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणारी ही निवडणूक आता मेमध्ये होईल, असा कयास बांधला जात आहे. याबद्दल काही नगरसेवकांनी आंनद व्यक्त केला आहे, तर काहींनी विनाकारण खर्च वाढणार म्हणत नाराजी दर्शवली आहे.
भाजपला मिळेल संधी
महापालिकेमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. ऐन निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी घोषणांचा बार उडवून दिला आहे. दोन महिन्यांपू्र्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, उड्डाणपूल अशा विविध घोषणांची सरबत्ती आपल्या भाषणात केली. त्यानंतर महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करायला मंजुरी देण्यात आली. आता पुन्हा एकदा निवडणुका लांबणार असलल्याने आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्क हे महत्त्वकांक्षी प्रकल्प राबण्याची संधी सत्ताधाऱ्यांना मिळणार आहे.
ओमिक्रॉनचे सावट
राज्यात येणाऱ्या काळामध्ये नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक आहे. मात्र, सध्या जगभरात फक्त ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची चर्चा आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला तर प्रभाग रचना अंतिम करून या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. सध्या राज्य सरकार शाळा पुन्हा बंद करायच्या का, यावरही चर्चा करत आहे. त्याबाबत लवकरच बैठक होणार आहे. त्यामुळे निवडणुका होणार की अजून पुढे ढकलणार हे येणारा काळच सांगेल.
पालिकेतील पक्षीय बलाबल
नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले होते. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या होत्या.
इतर बातम्याः