‘आमची निष्ठा आजही पक्षाबरोबर, अजित दादांबरोबर’; नाशिकमधील राष्ट्रवादीच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांवर जातीवादाची टीका केल्यानंतर आता दुसऱ्या गटाकडून त्या आरोपास प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ नेते उदय जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यांनतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याचे समोर येत आहे. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थानिक नेत्यांमध्ये आपापसात आरोपांच्या फैरी झडताना बघायला मिळत आहे. माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांवर जातीवादाची टीका केल्यानंतर आता दुसऱ्या गटाकडून त्या आरोपास प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ नेते उदय जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीत कुठेही दोन गट पडलेले नाहीत. आम्ही एकसंघ आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक आहोत”, असं उदय जाधव म्हणाले आहेत.
“आता झालेली निवडणूक, मागे झालेली निवडणूक आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पहिली आहे. छगन भुजबळ यांनी कुठल्या समाजावर टीका केलेली नाही. कुठल्या समाजाला त्यांनी दूर लोटलं नाही. कांदळकर सारख्या धनगर समाजाच्या व्यक्तीला जिल्हा परिषद सदस्य बनवलं. बाळासाहेब वाघ यांना सभापती पद दिलं. बंडू नाना भाबड सारखे आमचे जुने सहकारी आम्ही कोकाटे सहेबांबरोबर होतो. इथे त्यांचा जातीयवाद दिसत नाही”, असं उदय जाधव म्हणाले.
‘जातीयवाद पसरविणारे हे कोत्या बुद्धीचे लोक’
“छगन भुजबळ यांच्या बाबतीत जातीवादाचा प्रश्नच येत नाही. माझ्यासारख्या मराठी माणसाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गटनेता बनवणं, माझ्या पत्नीला अर्थ आणि बांधकाम सभापती पद दिलं. ही वेगवेगळ्या प्रकारची जी पदं मिळाली ती छगन भुजबळ यांच्यामुळे मिळाली. त्यामुळे तिथे कुठेही जातीयवाद दिसत नाही. जातीयवाद पसरविणारे हे कोत्या बुद्धीचे लोक असतात. आपलं काम चलविण्याकरता ते जातीचा आधार घेतात. त्यामुळे त्या जातीयवादाच्या म्हणण्याला काहीही तथ्य नाही”, असं प्रत्युत्तर उदय जाधव यांनी दिलं.
“ते 2014 ला राष्ट्रवादी आणि 2019 ला काँग्रेसचे उमेदवार होते. हिरामण खोसकर त्यांना सर्व माहिती आहे. त्यांना बोलायचं नाही. या गोष्टी ज्या घडून गेल्यात या त्यांच्या मनात आहेत ना. यापुढे अशा गोष्टी होत राहिल्या तर आम्हाला नाही वाटत की निकोपपणे पुढचं राजकारण करता येईल”, असं मत उदय जाधव यांनी मांडलं.
‘आमची निष्ठा आजही पक्षाबरोबर, अजित दादांबरोबर’
“छगन भुजबळ यांचा वाढदिवस असो समीर भाऊंचा वाढदिवस असो आम्ही आजही तिथे जातो. आमची निष्ठा आजही पक्षाबरोबर, अजित दादांबरोबर, जेष्ठ नेत्यांबरोबर आहे. त्यामुळे त्यांचा जो प्रश्न आहे वादाचा, मंत्रिपद मिळालं नाही. मिळालं ना, कोकाटे साहेबांना मिळालं. तो वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न असल्याने तो त्यांच्या पातळीवर सोडवतील. तिथे बसून ते समन्वय साधतील याची मला खात्री आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कुठेही दोन गट पडलेले नाहीत. आपण उपस्थित केलेली शंका चुकीची आहे”, असं उदय जाधव म्हणाले.
‘मी कोकाटे साहेबांना मानणारा कार्यकर्ता’
“अजून एक बोलायचं झालं तर काही बाबतीत माजी आमदार जयंत जाधव म्हणा आणि इतरही जिल्ह्यातील काही नेते यांच्याशी संपर्क साधला तर नक्कीच तुम्हाला काही गोष्टी याच्यातून उघड होतील. जमिनीचे व्यवहार आणि इतर काही गोष्टी यांच्यातून उघड होतील याची मला खात्री आहे. आम्ही आजही एकसंघ आहोत. कोकाटे साहेबांनी 1992 पासून मला युवकाचं अध्यक्षपद दिलं तेव्हापासून मी त्यांना मानणारा कार्यकर्ता आहे. मध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच माझा भुजबळ साहेबांशी संपर्क आला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी मला पाहिजे तितकी मदत केली. पाहिजे तितके मानाचे पद दिले. आम्ही कुठेच नाराज नाहीत. या दोघांमध्ये काही जण दुही पसरवायचे प्रयत्न करत आहेत. हे चुकीचं आहे”, अशी भूमिका उदय जाधव यांनी मांडली.