लेटरबॉम्ब फोडणाऱ्या नाशिकच्या पोलीस आयुक्तांचा महसूल मंत्र्यांकडे माफीनामा; थोरात मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची भाषा आता बदलली आहे. ते म्हणाले की, बाळासाहेब थोरात सुजाण आणि चांगले मंत्री आहेत. त्यांना पत्रातील भाषा चुकीची वाटत असेल, तर मी माफी मागतो. या पत्रातून कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. मी महसूल विभागाच्या विरोधात नाही. या विभागाचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे, अशी उपरतीही पोलीस आयुक्तांना झाली आहे.
नाशिकः महसूल अधिकारी (Revenue Officer) ‘आरडीएक्स’, तर दंडाधिकारी डिटोनेटर बनत आहेत. त्यामुळे जिवंत बॉम्ब तयार होत आहेत. जिल्ह्यात भूमाफियांनी सर्वसामान्यांची अक्षरशः लूट सुरू केलीय. महसूल अधिकारी त्यांच्या कह्यात आहेत. या भूमाफियांपासून नागरिकांना अभय मिळावे म्हणून महसूल दंडाधिकारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकार आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे द्यावेत, अशी सनसनाटी मागणी पोलीस महासंचालकांकडे करून थेट महसूल खात्यावर लेटबॉम्बमधून प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे नाशिकचे (Nashik) पोलीस आयुक्त (Police Commissioner) दीपक पांडेय यांनी अखेर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सपशेल माफीनामा मागितल्याचे समोर आले आहे. महसूलचे सर्व अधिकार स्वतःकडे मागणाऱ्या पोलीस आयुक्तांच्या पत्रामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संताप अनावर झाला. विशेषतः या पत्रातील गंभीर भाषेची थोरात यांनी दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिलाय.
काय म्हणाले थोरात?
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या सनसनाटी पत्रावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महसूल मंत्री म्हणाले की, कामकाजात सुधारणा करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याने शिफारशी केल्या, तर त्याचे केव्हाही स्वागत आहे. मात्र, महसूल अधिकाऱ्यांना आणि या विभागाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे त्यांना रुचले नाही. याच पद्धतीने पोलीस विभागाचे मूल्यमापनही करता येते. सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह जामिनावर आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट तुरुंगात आहेत. पुण्यात पोलिसांनी व्यापाऱ्यांचे अपहरण करून खंडणी मागितलीय. बीटकॉईन घोटाळ्यात पोलीस अधिकारी सहभागी आहेत. पोलिसांनी आधी आपल्या विभागाकडे लक्ष द्यावे. वाळू, रेशनधान्य, भेसळयुक्त अन्नपदार्थ, परमीट रूम, हातभट्टीची दारू याचे काय होते, हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, अशा शब्दांत महसूल मंत्र्यांनी ताशेरे ओढल्याचे समजते.
अन् आयुक्तांना उपरती…
महसूल मंत्री इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यामुळे पांडेय यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी या प्रकरणात थेट महसूल मंत्र्यांची सपशेल माफी मागितली आहे. थोरात सुजाण आणि चांगले मंत्री आहेत. त्यांना पत्रातील भाषा चुकीची वाटत असेल, तर मी माफी मागतो. या पत्रातून कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. फक्त दोनशे वर्षांपासून सुरू असलेल्या त्रुटी दूर करण्याचा हेतू आहे. मी महसूल विभागाच्या विरोधात नाही. या विभागाचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे, अशी उपरतीही पोलीस आयुक्तांना झाली आहे.
इतर बातम्याः