अपात्रतेच्या निकालाआधी मोठी बातमी, नाशिकमध्ये मनाई आदेश लागू
आमदार अपात्रतेच्या निकालाआधी नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये पोलिसांनी आजपासून पुढच्या 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू केले आहेत. या काळात 5 किंवा त्यापेक्षा जास्त जणांना शहरात एकत्र जमण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

चंदन पुजाधिकारी, Tv9 मराठी, नाशिक | 10 जानेवारी 2024 : महाराष्ट्रात शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकालाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असताना नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहरात पोलिसांनी मनाई आदेश लागू केले आहेत. नाशिक शहरात 10 जानेवारी म्हणजेच आजपासून पुढचे 15 दिवस 24 जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा सभा घेता येणार नाही. तसेच शहरात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे. या दरम्यान विना परवानगी मोर्चे आणि आंदोलन काढण्यास मनाई असणार आहे.
पोलिसांच्या मनाई आदेशानुसार 10 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत नाशिक शहरात स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, पुतळ्याचे दहन करण्यास देखील सक्त मनाई असणार आहे. पोलिसांच्या या मनाई आदेशामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण त्यामागील कारणही समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, शेतकरी आणि अन्य संघटनांकडून देण्यात आलेला आंदोलनाचा इशारा, तसेच मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेली आंदोलनं या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नुकतीच बैठक
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर करणार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी निकाल जाहीर केल्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याबाबत आणि उपाययोजना करण्याबाबत काल महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. या बैठकीत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित होत्या. त्यानंतर आज नाशिक पोलिसांनी मनाई आदेश जारी केल्याची माहिती समोर आलीय.
उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार
अयोध्येत श्रीराम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिकला गोदातीरी जाऊन महाआरती करणार आहेत. तसेच तिथे राम मंदिरात जाऊन श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. पण नाशिक पोलिसांनी मनाई आदेश दिल्यामुळे आता आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.