Nashik Water Scarcity : धरण उशाला, कोरड घशाला; मायानगरी मुंबईची तहान भागविणाऱ्या इगतपुरीची पाण्याविना तडफड
नाशिक (Nashik) जिल्ह्यासह मुंबईसारख्या (Mumbai) मायानगरीची तहान भागवणाऱ्या इगतपुरी तालुक्याची पाण्याविना (Water) तडफड सुरू आहे. धरणाचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा हा तालुका. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणासह अनेक धरणे येथे आहेत, पण तरीही आज येथील अनेक गाव आणि पाड्यांची अवस्था अतिशय बिकट आहे.
शैलेश पुरोहित, इगतपुरीः नाशिक (Nashik) जिल्ह्यासह मुंबईसारख्या (Mumbai) मायानगरीची तहान भागवणाऱ्या इगतपुरी तालुक्याची पाण्याविना (Water) तडफड सुरू आहे. धरणाचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा हा तालुका. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणासह अनेक धरणे येथे आहेत, पण तरीही आज येथील अनेक गाव आणि पाड्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला कशी असते, ते तुम्हाला येथेच पाहायला मिळेल. इथल्या महिला, लहान – लहान मुले दिवसभर पाण्याच्या शोधात वन वन फिरताना दिसतात. त्यातही कधी गढूळ, तर कधी दुर्गंधीयुक्त पाणीच नशिबाला येते. याची सारी जाण स्थानिक प्रशासनाला आहे. मात्र, ते फक्त पाहतात. डोळ्यावर कातडे ओढून घेतात. त्यामुळे येथील नागरिकांचा पाण्यासाठीचा वनवास कधी संपणार, असा प्रश्न कायम आहे. महाराष्ट्रातले हे एक उदाहरण झाले. जिथे पाणी आहे तिथे अशी अवस्था आणि जिथे पाणी नाही, तिथे कसे असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.
नगरपरिषद करते काय?
इगतपुरी नगरपरिषद मोठ्या थाटात भावलती पाणी योजना 24 तास सुरू केली. मात्र, दुसरीकडे इगतपुरीतल्या कथरूवांगण या आदिवासी पाड्याची व्यथा भयंकर आहे. या ठिकाणी हात धुवायला तर सोडाच घोटभर प्यायला सुद्धा पाणी मिळत नाहीय. हा पाडा इगतपुरी नगरपरिषदेच्या हद्दीत येतो. सुमारे 27 वर्षांपूर्वी त्याचा नगरपरिषदेत समावेश करण्यात आला. मात्र, परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे नगरपरिषद करते काय, असा प्रश्न पाड्यावरील नागरिक विचारत आहेत.
20 मिनिटांचे पाणीही बंद
कथरूवांगण पाड्यात एकूण 45 घरे आहेत. ज्यात जवळजवळ 200 लोक वस्ती करून राहतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगरपरिषदेने सात वर्षांपूर्वी दोन नळ कनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकित हे पाणी साठवले जाते. पंधरा दिवसांत एक वेळा जास्तीत जास्त 20 मिनिटे पाणीपुरवठा केला जातो, असे येथील आदिवासी बांधवांचे म्हणेणे आहे. मात्र, सध्या तेही पाणी मिळत नाही. मागील काही दिवसांपासून येथे तळेगाव येथील विहिरीतून पाणी सोडण्यात येते होते. हे पाणी गढूळ असायचे. त्यात मेलेले उंदीर, साप सापडले होते. हा प्रकार रहिवाशांनी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना सांगितला. मात्र, त्यांची कोणीही दखल घेतली नाही.
2 किलोमीटरवरून पायपीट
सध्या या सध्या पाड्यावरील महिलांना 2 किलोमीटर रेल्वेरुळातून जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागते. महामार्गावरील एका हॉटेलमधून झिरपणारे पाणी रेल्वे हद्दीच्या मोरीत जमा होते. तेथून आणि पर्यायी महामार्गालगत असलेल्या गढूळ धक्क्यातून जीवावर खेळत त्या पाणी आणत आहेत. हे पाणीही गढूळ आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाण्याची सोय करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा पाड्यावरील गावकऱ्यांनी दिलाय.
इतर बातम्याः