सगेसोयरेच्या अध्यादेशावर नाथाभाऊंना शंका; खडसे म्हणाले, आजचं मरण…
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा समाजाचा प्रचंड दबाव होता आणि या दबावामुळे सरकार झुकलं. त्यादृष्टीने सरकारने हे आंदोलन यशस्वीरित्या सोडवलं असं म्हणता येईल. मात्र उद्या जर फसवणूक झाली तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले. तसेच अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर टिकणार की नाही याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली आहे.
किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 27 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला अभूतपूर्व यश आलं आहे. राज्य सरकारने अखेर सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे मराठा समाजातील सग्यासोयऱ्यांनाही आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण सरकारच्या या अध्यादेशावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी संशय घेतला आहे. सरकारने काढलेला अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर किती टिकेल याची शंका आहे. सरकारने फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
सरकारने आजच मरण उद्यावर ढकलावं या दृष्टीने हा अध्यादेश काढलेला दिसतोय. सरकार या अध्यादेशाद्वारे मराठा समाजाची दिशाभूल करतंय का काय? असं होता कामा नये. कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकला पाहिजे. पण हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल याबाबत मला शंका आहे. कारण सगेसोयरे रक्ताच्या नात्यात येत नाही. त्यामुळे सरकार अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाची दिशाभूल करतंय की काय असं वाटतं. तसं होऊ नये, असं आमदार एकनाथ खडसे म्हणाले.
तर किए किराएवर पाणी
मराठा समाजाचा प्रचंड दबाव होता आणि या दबावामुळे सरकार झुकलं. त्यादृष्टीने सरकारने हे आंदोलन यशस्वीरित्या सोडवलं असं म्हणता येईल. मात्र उद्या जर फसवणूक झाली तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ही पीटिशन दाखल आहे, त्यांनतर हा निर्णय झाला असता, तर तर कायद्याच्या चौकटीमध्ये निकषांमध्ये बसवून घेतल्यासारखे वाटले असते. क्युरेटिव्ह पीटिशनचा निर्णय वेगळा आला आणि त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेश विसंगत निघाला तर सरकारच्या किए किराएवर पाणी फिरल्यासारखे होईल, असं ते म्हणाले.
भुजबळच सांगू शकतील
छगन भुजबळ हे सरकारमध्ये महत्त्वाचं मंत्रिपद भूषवत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात काय घडलं? नेमकी काय चर्चा झाली? हे माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने भुजबळ सांगू शकतील. त्यामुळे मंत्रिमंडळातला एखादा सदस्य मत व्यक्त करतो तेव्हा त्याला अधिक महत्त्व असतं. त्या मताला अधिक वजन असतं, असं एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.