नाशिक : देशामध्ये वाढती महागाई ही एक मोठी समस्या (Problem) बनत आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांना जगणे देखील अवघड झाल्याचे चित्र देशात बघायला मिळते आहे. त्यातच आता सणांना सुरूवात झाल्याने अधिक खर्च होतो. मात्र, वाढती महागाई बघता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (Nationalist Congress) नाशिक शहरात खास गणपती उत्सवासाठी एक शक्कल लढवलीयं. वाढती महागाई आणि गणेश मूर्तींच्या वाढत्या किंमती यामुळे सर्वसामान्यांना बाप्पाच्या मूर्ती घेण्यात अडचणी येतात. हीच समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून एक खास उपक्रम (Activity) शहरामध्ये राबवला जातोयं.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलायं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आणि शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून शहरात ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर गणेश मूर्तींच्या विक्री केंद्राची स्थापना करण्यात आलीयं. या केंद्रात लोकांना अगदी स्वस्त किंमतींमध्ये गणेश मूर्ती मिळणार आहेत. यामुळे कुठेतरी महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. आपल्याला माहितीयं की, गणेश मूर्तींच्या किंमती किती जास्त वाढल्या आहेत.
नाशिकच्या या गणेश मूर्ती विक्री केंद्रावर त्याच दरांमध्ये अत्यल्प किंमतीत गणेश मूर्ती मिळणार असल्याने भाविकांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली होती. दरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी या अत्यल्प दरात असलेल्या सुबक गणेश मूर्तींच्या विक्री केंद्रावर भेट द्यावी आणि धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. पहिल्याच दिवसाची गर्दी पाहता पुढील काही दिवस या गणेश मूर्तींच्या विक्री केंद्रावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.