राज्यात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं नेमकं कारण
नाशिकच्या सटाणा नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.
नाशिक : महाराष्ट्राचे राजकारण असे आहे की, कोणताही पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे चारही मोठे पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही आणि त्यांचे लोकप्रतिनिधीही निवडून आणू शकत नाही. त्यासाठी दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन युती करावी लागते. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष ही युतीचे राजकारण करीत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. (No party in the Maharashtra can establish power on its own; Ramdas Athavale explained reason)
नाशिकच्या सटाणा नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी दगाजी चित्रमंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी सटाणा नगर परिषदेतर्फे रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला. अनेक वर्षांनंतर रामदास आठवले सटाणा शहरात आले असल्याने त्यांना भेटण्यास, पाहण्यास आणि ऐकण्यास सटाणा, देवळा, बागलाण, नाशिक आणि धुळे येथील त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. शहरात जागोजागी रामदास आठवले यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
1998 मध्ये काँग्रेस सोबत युती केल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार लोकसभेत निवडुन आले होते. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी राजकीय निर्णय घेत असतो. केंद्र सरकारमध्ये मी सहभागी झाल्यापासून संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, आसामपासून गुजरातपर्यंत संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे , असे रामदास आठवले म्हणाले. यावेळी सटाणा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे, आमदार दिलीप बोरसे, रिपाइंचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, राज्य सचिव श्रीकांत भालेराव, चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आठवलेंकडून कविता सादर
सटाणा नगरीच्या विकासासाठी खासदार निधी देण्याची मागणी नगराध्यक्ष मोरे यांनी केली असता रामदास आठवले म्हणाले की, माझ्या कडे काय मागायचे ते मागा कारण मी आहे तुमच्या साठी जागा माननीय उद्धव ठाकरेंच्या मागे तुम्ही लागा मग मी फुलवून दाखवितो सटाण्याच्या बागा अशी कविता आठवले यांनी यावेळी सादर केली.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्कर्षासाठी काम केले, मात्र त्यांनी देश घडविण्याचेही काम केले आहे. नदीजोड प्रकल्प त्यांनी देशाला सुचवला. त्यांनी दामोदर व्हॅलीची निर्मिती केली. विविध जाती धर्माच्या, विविध भाषेच्या, गरीब श्रीमंत सर्व वर्गाच्या माणसांना एकत्र जोडणारा समतेचा मार्ग, राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, असे रामदास आठवले म्हणाले.
नाशिक विमानतळाला दादासाहेब गायकवाडांचे नाव द्यावे
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव नाशिक विमानतळाला मिळाले पाहिजे, ही आंबेडकरी जनतेची जुनी मागणी असून या मागणीच्या पूर्ततेसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची आपण शिष्टमंडळासह भेट घेऊ असे रामदास आठवले म्हणाले.
इतर बातम्या
नारायण राणे म्हणाले, एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले; आता विनायक राऊत म्हणतात, राणेंना ठोकम ठोकीची सवयच
(No party in the Maharashtra can establish power on its own; Ramdas Athavale explained reason)