आता शहरी भागातही स्वस्त भाव धान्य दुकाने सुरू होणार; छगन भुजबळांच्या प्रयत्नांना यश
राज्यातील कोरोना आजारामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.
नाशिक : राज्यातील कोरोना आजारामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. (now Ration shops will open in urban areas soon: Chhagan Bhujbal)
राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव दुकानांची पुर्नरचना करण्याबाबतची कार्यवाही यापूर्वी करण्यात आली होती मात्र या कार्यवाहीला लागणारा कालावधी लक्षात घेता 2018 मध्ये शहरी भागात नवीन दुकाने वितरणाच्या जाहिरनाम्यास स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आता उठवण्यात आली आहे, त्यामुळे शहरी भागातही आता स्वस्त भाव धान्य दुकाने सुरू होणार आहेत.
सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाने महाराष्ट्र राज्यात गरीब व गरजू लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरी भागातील अशी लोकसंख्या अधिक आहे. तसेच कोरोना या आजाराची तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कालावधीत रास्त भाव दुकानांमार्फत राज्यातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य तसेच केरोसिन वाटपाचे महत्वपूर्ण कार्य चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
राज्यात जुलै व ऑगस्टमधील मुसळधार पावसामुळे अनेक शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरी भागातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत तेथे सरकारी मदत अन्नधान्याच्या स्वरूपात रास्तभाव दुकानदारांच्या माध्यमातून देणे अनिवार्य असून शहराची मूळ परिस्थिती पूर्वपदावर आणणे ही शासनाची जबाबदारी ठरते, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
इतर बातम्या
Aurangabad Top 5: औरंगाबादकरांसाठी आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या, जाणून घ्या मोजक्या शब्दात
सुप्रिया सुळेंचा दरेकरांच्या विधानावर बोलण्यास नकार, म्हणाल्या; माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार
(Ration stores will now open in urban areas as well : Chhagan Bhujbal)