PNB Scam: नाशिकमध्ये चोकसीची जमीन विक्री आयकरने थांबवली; अनेक जण रडारवर, प्रकरण काय?
नाशिकमध्ये मेहुल चोकसीच्या मालमत्तांवर आयकर विभागाने जप्ती आणली आहे. त्यात इगतपुरीतील मुंढेगावात असलेल्या बळवंतनगरमधील 9 एकर 28 गुंठे जमिनीचा समावेश आहे. या कारवाईने चोकसीसोबत व्यवहार केलेल्या इतर व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत. चोकसी आणि नीरव मोदी हे पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे. मात्र, जानेवारी 2018 मध्ये ते देश सोडून पळाले. त्यांनी बँक घोटाळ्यातील पैशातून घेतलेले एकेक घबाड आता समोर येत आहे.
नाशिकः पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीची (Mehul Choksi) जमीन विक्री आयकर विभागाने थांबवली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगपुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन आयकरच्या अधिकाऱ्यांनी या चोकसीच्या जमिनीचे व्यवहार पुढील काळात होऊ नयेत, अशी नोटीस दिलीय. बँकेच्या घोटाळ्यातून चोकसीने ही जमीन विकत घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. चोकसीने नाशिक जिल्ह्यात आणखी कोणा-कोणाशी व्यवहार केले आहेत, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आयकरच्या रडावर अनेक व्यक्ती आणि व्यवहार असल्याचे समजते. चोकसीने इगतपुरी तालुक्यात बनावट कंपन्या स्थापन केल्या. त्यांच्या नावावर जमिनीची खरेदी केली. त्यातल्या अनेक जमिनीची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. हेच पाहता चोकसी इगपुरी येथील जमीन विकू शकतो, हे ध्यानात घेत हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नऊ एकरवर टाच
नाशिकमध्ये मेहुल चोकसीच्या मालमत्तांवर आयकर विभागाने जप्ती आणली आहे. त्यात इगतपुरीतील मुंढेगावात असलेल्या बळवंतनगरमधील 9 एकर 28 गुंठे जमिनीचा समावेश आहे. आयकर विभागाने प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रॅन्जेक्शन अॅक्ट अंतर्गत मेसर्स नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसइझेड लिमिटेड आणि मेसर्स गीतांजली जेम्स लि.ची मालमत्ता जप्त केली आहे. बळवंतनंगर मुंढेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक, येथील जमन पूर्णपणे केंद्र सरकारच्या सर्व भारमुक्त निहीत असतील. अशा जप्तीच्या संदर्भात कोणतीही भरपाई देय असणार नाही, असे आयकरने म्हटले आहे. या कारवाईने चोकसीसोबत व्यवहार केलेल्या इतर व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत. चोकसी आणि नीरव मोदी हे पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे. मात्र, जानेवारी 2018 मध्ये ते देश सोडून पळाले. त्यांनी बँक घोटाळ्यातील पैशातून घेतलेले एकेक घबाड आता समोर येत आहे.
इगपुरीतच खरेदी का?
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथे मुंढेगाव शिवारात एक चित्रनगरी प्रस्तावित आहे. भविष्यात येथे असे काही घडलेच, तर जमिनीचा भाव अजून कैकपट वाढेल. शिवाय मुंबईपासून इगतपुरी हाकेच्या अंतरावर आहे. येथील निसर्ग सौंदर्याची महाराष्ट्राला वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. हे सारे पाहता हे ठिकाण गुंतवणुकीसाठी अगदी योग्य असल्याचे चोकसीने ताडले. त्यामुळेच त्याने येथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक जमिनीत केली. आता हीच पाळेमुळे आयकर विभागाकडून खणली जात आहेत.
इतर बातम्याः