मोठी बातमी! मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांना स्वातंत्र्य नाही? प्रकाश आंबेडकर यांचा धक्कादायक दावा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारबद्दल धक्कादायक दावा केलाय.
नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारबद्दल धक्कादायक दावा केलाय. मोदी सरकारमधील मंत्रीच सुरक्षित नाहीत. त्यांच्या मनात मुंबईत येण्याची भीती असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत बौद्ध धम्म मेळावा होतोय. या कार्यक्रमात भाषण करताना प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक विधान केलंय.
“माझे एक मित्र आहेत. त्यांना मी लोकसभेत निवडून येण्यासाठी मदत देखील करतो. ते मला म्हणाले, मला भेटायचं आहे. मी म्हणालो मला भेटायला मुंबईला या, तुम्ही मंत्री आहात. ते म्हणाले मी दिल्ली सोडून येऊ शकत नाही. कारण माझ्यावर नजर आहे. जिथे मंत्र्याला स्वातंत्र्य नाही, तिथे तुमचे काय?”, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“आता एक नवीन कायदा यायच्या बेतात आहे, तो म्हणजे moral policing, म्हणजे तुम्ही खाणार काय, जगणार काय याचे अधिकार सरकारकडे जातील. घटनेने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य राहणार नाही”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“एखादं श्रद्धा सारखं प्रकरण बाहेर दिसतं, विकृती समाजात आहे. पण याला धरून शासन moral कायदा गठीत करू पाहत आहे. असा प्रचार सुरू आहे की, या देशात जे पंतप्रधान आहे, त्यांच्या तोडीचं कुणीच नाही. आपण दुर्दैवाने त्याला बळी पडतो”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“या देशात आपल्याला खासदार निवडण्याचा अधिकार आहे, ते खासदार पंतप्रधान निवडतात. अजून या देशात उतरंडीची व्यवस्था आहे, तोपर्यंत न्हावी, कोळी, पारधी समाजाला मते मिळणार नाही”, असं ते म्हणाले.
“2024 हा शेवटचा कालखंड आहे. जर मोदींनी सांगितलं की, राहुल गांधी माझ्या मागे उभे रहा, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकेल, तर राहुल गांधी त्यांच्या मागे उभे राहतील. कारण त्यांनी व्यवस्थाच तशी केली आहे, माझ्यामागे उभे रहा, नाहीतर जेल मध्ये जा”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“इथले लढे राजकीय लोकं लढतील, असं समजू नका. हा लढा आपल्यालाच लढावा लागेल”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा चोर आहे”, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“तुम्ही 2024 ला सत्ता बदला. पहिले जे दोन आरोपी असतील ते मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी असतील. 2024 ला मोदी विरोधात जातील यासाठी आताच कामाला लागा”, असं आवाहन त्यांनी केलं.
“2024 मध्ये एकतर आपण तरी हारू, नाहीतर ते तरी हारतील”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.