पावसाचा तडाखा सुरूच; नाशिक जिल्ह्यात जोरदार हजेरी, द्राक्ष बागांचे नुकसान
नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुपारी तीनपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. कडकडणाऱ्या विजा आणि ढगांच्या गडगडाटाने भीतीदायक वातावरण तयार झाले होते.
नाशिकः नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुपारी तीनपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. कडकडणाऱ्या विजा आणि ढगांच्या गडगडाटाने भीतीदायक वातावरण तयार झाले होते.
सप्टेंबरच्या एक तारखेपासून बरसणाऱ्या पावसाने नाशिक जिल्ह्यात अजूनही विश्रांती घेतलेली नाही. गुरुवारी दुपारी तीनपासून शहराच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कडकडणाऱ्या विजा आणि ढगांच्या गडगडाटाने भीतीदायक वातावरण तयार झाले होते. कालपासून पडणाऱ्या या पावसाने अनेक ठिकाणी द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.
निफाड, येवला, कळवणला झोडपले
पावसाने काल बुधवारी निफाड, येवला, कळवणसह अनेक तालुक्यांना झोडपून काढले. यात कुंभारी (ता. निफाड) येथे साडेचारच्या सुमारास गारांचा पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. आहेरगाव, मुखेड, लोणवाडी, कारसूळ, जोपूळ, पालखेड, शिरवाडे वणी, अभोणा परिसरालाही पावसाचा तडाखा बसला. येवला तालुक्यातल्या राजपुरात पुंडलिक अलगट यांच्या घरावर वीज कोसळली. मात्र, यात सुदैवाने सारेच बचावले.
वीज कोसळून शेतकरी ठार
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक तालुक्यात वीज पडून एक शेतकरी जागीच ठार झाला. चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे (वय 45) व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला. त्यात रंजना थोडावेळ बेशुद्ध पडल्या. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी छायाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे, तर इतर दोन मुली अपेक्षा (वय 14) आणि अक्षरा (वय 11) यांच्या हाताला झटका पडून बेशुद्ध पडले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे. तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. या घटनेत येथे चरणाऱ्या दहा शेळ्या जागीच ठार झाल्या.
कधीपर्यंत आहे पाऊस?
कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार 9 ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे शाहीन वादळाचा शनिवारी (9 ऑक्टोबर) आणि रविवारी (10 ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्राला जबर तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे 16 ते 18 ऑक्टोबर आणि राजस्थानमध्ये 13 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे.
इतर बातम्याः
नाशिकमध्ये 122 नगरसेवक गॅसवर; कुठला प्रभाग कुठे जोडणार, यावर राजकीय गणित ठरणार!
भूमाफिया रम्मीला पोलीस कोठडी, 20 जणांवर खुनाचा गुन्हा; राजकीय दबाव झुगारून केलेली कारवाई चर्चेतhttps://t.co/OJWUA4TpDB#NashikPolice|#LandMafiaJimmy|#HimachalPradesh|#Anandwalimurdercase
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2021