पवार कुटुंबात काका विरुद्ध पुतण्या, आता ‘या’ पुतण्याची काका अजितदादांवर पहिल्यांदाच टीका; म्हणाला, दादांनी जे केलं, त्यामुळे…
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेला 50 हजार लोक उपस्थित होते. लांबून लांबून लोक आले होते. मीही त्या गर्दीत जाऊन बसलो होतो. लोकांची मानसिकता समजून घेत होतो, असं रोहित पवार म्हणाले.
जळगाव | 6 सप्टेंबर 2023 : पवार कुटुंबात सध्या काका विरुद्ध पुतण्या असा सामना पाहायला मिळत आहे. काका शरद पवार यांना धोबीपछाड करत पुतण्या अजित पवार यांनी भाजपची साथ धरली. त्यानंतर अजित पवार यांनी थेट काका शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांना निवृत्तीचा सल्लाही दिला. हा सल्ला देताना शरद पवार यांच्यामुळेच आपल्या राजकारणाची कोंडी होत असल्याचंही अप्रत्यक्षपणे सूचित केलं. त्यावर शरद पवार यांनी मी निवृत्त व्हायला तुम्ही माझं काय पाहिलंय? असं म्हणत अजितदादा गटाला अंगावरच घेतलं. या काका पुतण्यांची ही नुरा कुस्ती सुरू असतानाच आता अजितदादांवर त्यांच्या पुतण्याने थेट टीका केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच टीका केली आहे. अजितदादांनी जी भूमिका बदलली ती महाराष्ट्रात कोणालाही पटलेली नाही, अशी टीका करतानाच आम्हाला त्यावर जास्त बोलायचं नाही. म्हणून बारामतीमध्ये अजित दादा परत या अशा घोषणा देण्यात आल्या. शेवटी ते मतदार आहेत त्यांना अधिकार आहे, असं रोहित पवार म्हणाले.
त्या चौकशीचं काय झालं?
सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी चेंगराचेंगरी झाली बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. एक ज्युडीशिअल इन्क्वायरी व्हावी अशी आम्ही मागणी केली. पण अधिकाऱ्यांची समिती नेमली गेली. त्याचंपुढे काय झालं? याचं उत्तर सुद्धा राज्य सरकार देत नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या चौकश्यांच्या फार्सचा पर्दाफाश केला. तसेच सरकारच्या या चौकश्यांच्या घोषणांना न भूलण्याचं आवाहनही त्यांनी अप्रत्यक्षपणे केले.
पवारांना ऐकण्यासाठी 50 हजार लोक
उन्हामुळे चुळबुळ होत होती. लोक अस्वस्थ झाले होते. यावेळी पवार साहेब स्टेजवर भाषण करत होते. मी जनतेमध्ये जाऊन बसलो होतो. शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो आणि आपणही त्यांच्याच एक भाग आहोत असं त्यांना विश्वास दिला. पवार साहेबांची सभा पाहण्यासाठी 50 हजाराहून जास्त लोक या ठिकाणी एकत्र आले होते. सभा यशस्वी झाली आहे, असा दावा त्यांनी केला.
दुष्काळ जाहीर करावा लागणारच
शरद पवारांसोबत भाजपने जे काय केलं आणि जे निष्ठावंत शरद पवारांसोबत होते ते भाजपसोबत सत्तेसाठी गेले हे लोकांना आवडलेलं नाही. शरद पवार यांची भीती इथल्या तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांना आहे. पवार साहेबांच्या सभेपूर्वी त्यांना बैठक घ्यावी लागली. इथल्या समस्यांबद्दल त्यांनी चर्चा सुद्धा केली. लवकरात लवकर या सरकारला दुष्काळ जाहीर करावा लागणार आहे, असं ते म्हणाले.
भाजपच्या व्यक्तीचा हात
भाजप सरकार मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये. आरक्षणाच्या प्रश्नी ज्युडिशिअल इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि यातूनच हा प्रश्न सुटेल. जुडीशिअल कमिटी असल्यामुळे नेमकं कळेल की त्यावेळी फोन कुणाचा गेला होता. कुणाच्या फोनमुळे त्या ठिकाणी लाठीमार झाला. गोळीबार झाला. लाठीमार, गोळीबार प्रकरणात भाजपच्याच व्यक्तीचा हात असू शकतो, असा आरोपही त्यांनी केला.