मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टरवर शाईफेक
नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून एका डॉक्टरावर शाईफेक करण्यात आली आहे. या डॉक्टराने मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्याविरोधात संभाडी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसून त्याच्यावर शाईफेक केली.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून संबंधित डॉक्टरवर शाईफेक करण्यात आली आहे. नाशिकच्या सिडको भागात आयुर्वेद वैद्य डॉ. विजय गवळी यांचा निषेध करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये जावून शाईफेक केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर डॉक्टर विजय गवळी यांनी मी सुद्धा मराठा असं म्हटलं. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ बनवला. या व्हिडीओत आंदोलकांनी डॉक्टरला भूमिका मांडण्यास सांगितलं. त्यानंतर डॉक्टर भूमिका मांडू लागतो.
मी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाच आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल त्याबद्दल क्षमस्व, असं डॉक्टर विजय गवळी म्हणताना दिसतात. त्यावर आंदोलक आपली भूमिका मांडतात. “आम्हाला तुमचा अपमान करण्याचा उद्देश नाही. तुम्ही आदरातिथ्य आणि वडीलधारी आहात, तुम्ही असं करणं चुकीचं आहे. आमच्या भावना तीव्र आहेत. आम्ही मराठा म्हणून जगण्या-मरण्याची लढाई लढतोय. तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीकडून असं अपेक्षित नाही”, असं आंदोलक व्हिडीओत बोलताना दिसतात.
डॉक्टरने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं होतं?
संबंधित डॉक्टराकडून वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली होती. त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टराचं क्लिनिक गाठत त्याच्या तोंडावर शाईफेक केली. यावेळी आंदोलकांनी डॉक्टराच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला. जरांगे पाटील यांचे सगेसोयरे मुसलमान असल्याची पोस्ट डॉक्टराने केली होती. या पोस्टमुळे चिडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या आंदोलकांनी सिडको येथील विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून त्यांच्या अंगावर शाईफेक केली.
दरम्यान, या आंदोलनाला आणखी वेगळं वळण लागू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे. जरांगे पाटील यांच्याबाबत केलेली पोस्ट संबंधित डॉक्टरने आता डिलीट केली आहे. त्याचबरोबर आपल्याकडून चुकून अशाप्रकारची पोस्ट झाल्याची कबुली डॉक्टरने दिलेली आहे. त्यामुळे या वादावर आता तात्पुरता स्वरुपाचा पडदा पडल्याचं बघायला मिळत आहे.