सरकार बदलेल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण करू; किरीट सोमय्या यांना क्लिनचीट मिळताच राऊत यांचा इशारा
तत्कालीन राज्य सरकारने आयएनएस विक्रांत 60 कोटीला भंगारात विकण्याचा निर्णय घेताल होता. त्याचा भाजपकडून निषेध नोंदवण्यात आला होता.
नाशिक: भाजप नेते किरीट सोमय्या यांना सेव्ह विक्रांतप्रकरणी क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सोमय्या यांना या प्रकरणात दिलासा कसा मिळाला? याची विचारणा करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहेत. तसेच सरकार बदलेल तेव्हा सगळ्यांचाच हिशोब पूर्ण करू, असा सूचक इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
सरकार बदलल्यावर अनेक गोष्टी होत असतात. याचा अर्थ तो विषय संपलेला नाही. विक्रांतसाठी पैसे गोळा झाले हे सर्वांनी पाहिलं. मग तो एक रुपया असेल किंवा 50 कोटी. पैशांचा अपहार झालेलाच आहे. अपहार हा अपहारच असतो, असं संजय राऊत म्हणाले.
पैसे राजभवनात गेले म्हणतात. राजभवन म्हणते पैसे आलेच नाही. हाच सर्वात मोठा पुरावा आहे. जमा केलेले पैसे राजभवनात जमा केले असं म्हटलं गेलं. राजभवन म्हणतं एक रुपया आला नाही. यापेक्षा कोणता पुरावा असू शकतो? असा सवालच त्यांनी केला.
किरीट सोमय्यांना क्लिनचीट कशी दिली हे राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारा. आमच्या लोकांना क्लिनचीट मिळणार नाही. खरे तर सेव्ह विक्रांत हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तो ईडीच्या अख्त्यारितील विषय आहे. ठिक आहे. आज क्लिनचीट मिळाली असेल. पण याचा अर्थ 2024ला हे प्रकरण समोर येणार नाही असं नाही. सरकार बदलेलं. कोणतंही सरकार कायमस्वरुपी नसतं. सरकार बदलेल आणि सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल. याविषयी मी फार काही बोलणार नाही. पण मी नक्कीच केंद्राला पत्र लिहील, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
तत्कालीन राज्य सरकारने आयएनएस विक्रांत 60 कोटीला भंगारात विकण्याचा निर्णय घेताल होता. त्याचा भाजपकडून निषेध नोंदवण्यात आला होता. त्यानंतर 10 डिसेंबर 2013 रोजी सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली प्रतिकात्मक रित्या जनतेकडून निधी गोळा केला होता. या मोहिमेतून त्यांना 11 हजार रुपये मिळाले होते.
मात्र, राऊत यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. सोमय्यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली 58 कोटी जमा केले आणि चार बिल्डरांशी मनी लॉन्ड्रिंग करून ही रक्कम आपल्या मुलाच्या कंपनीत वळवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती.