‘एकनाथ फेकनाथ मिंधेंना फक्त मिर्च्या झोंबल्या, आता आत…’, संजय राऊत यांची जीभ घसरली
"आपल्याला शिवसेना दिल्लीपर्यंत न्यायची आहे. राज्य हातात घ्यायची आहे. उद्धव ठाकरे यांच्या हाती देशाचं नेतृत्व द्यायचं आहे. मगाशी पाहिलं एक माणूस तोंड लपवून फिरत होता. कुणी तरी सांगितलं राहुल नार्वेकर आहे", अशी टीका संजय राऊतांनी केली.
नाशिक | 23 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचा नाशिकमध्ये आज मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाषण केलं. यावेळी राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. “ही शिवसेना आहे. ही मिंध्यांची सेना नाही. शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातीलच आहे. एकनाथ मिंधे फेकनाथ मिंधे यांना मिरच्या झोंबल्या आहेत. आता फक्त मिरच्या झोंबल्या ठेचा आतमध्ये जायचा आहे”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
“आपल्याला शिवसेना दिल्लीपर्यंत न्यायची आहे. राज्य हातात घ्यायची आहे. उद्धव ठाकरे यांच्या हाती देशाचं नेतृत्व द्यायचं आहे. मगाशी पाहिलं एक माणूस तोंड लपवून फिरत होता. कुणी तरी सांगितलं राहुल नार्वेकर आहे. त्यांना कुणी तरी सांगितलं शिवसेना पाहायची असेल तर कान्हेरे मैदानावर जा”,अशी टीका राऊतांनी केली.
‘गद्दारांना गाडायचं, राज्य उलथून टाकायचंय’
“शिवसेनेने म्हणे हिंदुत्व सोडलं. त्यामुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली. शिवसेनेने विचार सोडला. अरे अडीच वर्ष त्याच सरकारमध्ये मंत्री म्हणून चरत होता ना. मग अडीच वर्षात जे खोके जमा केले ते शिवसेनेच्या तिजोरीत जमा केला. शिंदे हा विराट जनसमुदाय पाहा. हे महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे. हा उसळलेला उद्रेक आहे. महाराष्ट्रात आपल्याला राम राज्य आणायचं आहे. शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे. गद्दारांना गाडायचं आहे. गद्दारांचं राज्य उलथून टाकायचे आहे. त्यांना जमिनीत ५० फूट असं गाडायचं आहे की गद्दारीचं नावच निघणार नाही. फक्त शिवसेनाच राहील”, असं संजय राऊत म्हणाले.
‘देशात मोदी फक्त दोघांना घाबरतात’
“या महाराष्ट्रात नव्हे देशात मोदी फक्त दोघांना घाबरतात, शेतकऱ्यांना आणि ठाकऱ्यांना. फक्त दोघांना. शेतकरी आणि ठाकरे. बाकी कुणाला घाबरत नाही. संपूर्ण शेतकरी कष्टकरी उद्धव ठाकरे यांच्या पाठी ठामपणे उभे आहेत. परवा मोदी आले होते. काय केलं. शेतकऱ्यांना अटक केली. शेतकऱ्यांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवलं. शेतकऱ्यांना जवळ येऊ दिलं नाही. अशा पद्धतीने जुलमी राज्य सुरू आहे”, असा दावा संजय राऊतांनी केला.