भाजपकडून शिंदे गटाला फक्त 48 जागा, संजय राऊत यांनी लायकीच काढली; म्हणाले, उद्या यांना ते…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप विधानसभेच्या 240 जागा लढवणार असल्याचं म्हटलं आहे. शिंदे गटाला 48 जागा जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचले आहे.
चैतन्य मनिषा अशोक, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकाची फॉर्म्युला जाहीर केला आहे. त्यात त्यांनी शिंदे गटाला अवघ्या 48 जागा मिळणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बावनकुळे यांचं हे विधान आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाची लायकीच काढली आहे. उद्या भाजपवाले त्यांना पाच जागाही देतील. हीच शिंदे गटाची लायकी आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी शिंदे गटाचे वाभाडेच काढले.
ही त्यांची लायकी आहे. शिवसेनेने एका जागेसाठी 2014मध्ये युती तोडली होती. स्वाभिमानासाठी युती तोडली होती. यांना मात्र तुकडे फेकले आहेत. आयुष्यभर त्यांना तुकडे फेकले जातील. त्यांना तुकडा तोंडात चघळत बसावे लागेल. यांना कुठला आलाय स्वाभिमान? भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले 40-25 जागा देऊ. उद्या यांना भाजपवाले पाच जागाही देतील. ही यांची लायकी आहे. यांना महाराष्ट्रातील शिवसेनाचा रुबाब दरारा तोडायचा होता. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचायचे होते. म्हणून शिवसेना तोडली. त्यामुळे मिंधे लोकांना त्यांनी जवळ केलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
सरकार कोर्टबाजीत रमलंय
लाँगमार्चमध्ये एका शेतकऱ्याचा काल मृत्यू झाला. हा सरकारचा हलगर्जीपणा बेफीकिरी आहे. वेळेत पावलं उचलले नाही. दोन मंत्र्यांना चर्चेसाठी पाठवलं होतं. त्यांच्याकडून काही घडू शकले नाही. इतके फुसके मंत्री नेमले. त्यांचे कोण ऐकणार? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही असं ते म्हणतात. वाऱ्यावर नाही शेतकरी रस्त्यावर आहे. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचं प्रायश्चित तुम्ही घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने या सरकारवर निसर्ग कोपला आहे. विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात गारपीट झाली. शेतकरी हवालदिल आहे. अन् सरकार कोर्टबाजीत रमलंय. विरोधकांच्या नाड्या आवळण्यात सरकारला रस वाटतोय, असे आसूडच राऊत यांनी ओढले.
त्यांना फक्त निकालाची चिंता
शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळला ते बघा. आमचं आम्ही बघू काय करायचं ते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते गटातटाकडे पाहत आहेत. ते पाहण्यात त्यांचा वेळ जात आहे. मुख्यमंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र माहीत आहे का? हा प्रशन आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजले आहे का? हा प्रश्न आहे. उद्योजकांचे प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे का? हा प्रश्न आहे. दुर्देवाने त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यांना फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चिंता लागली आहे. मुख्यमंत्र्यांना चिंता वाटते की, निवडणूक आयोगाप्रमाणे हा निकाल विकत घेऊ का? त्यासाठी तयारी सुरू आहे. पण महाराष्ट्राला न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, असं ते म्हणाले.