नाशिक: आधी काँग्रेसविरोधात बंड केलं. त्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. भाजपनेही जाहीर पाठिंबा दिला नाही. तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही बलाढ्य पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली. तीन मोठे पक्ष समोर असल्याने पराभव होणार माहीत असूनही मैदानात झुंज दिली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांनी ही किमया करून दाखवली. मात्र, एवढा मोठा आणि नेत्रदीपक विजय होऊनही सत्यजित तांबे विजयाचा जल्लोष करणार नाहीत. भावनिक कारणामुळे ते विजयाचा जल्लोष करणार नाहीत. तसं त्यांनी ट्विट करून सांगितलं.
सत्यजित तांबे यांचे सहकारी आणि नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचं बुधवारी रात्री अपघाती निधन झालं. काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मित्राचं निधन झाल्याने सत्यजित तांबे अत्यंत व्यथित झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.
विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत. पण विजयोत्सव साजरा करणार नाही. माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय. त्यामुळे कोणताही आनंदोत्सव करणार नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी 3 ते 7 फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती, असं आवाहन सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरून केलं आहे.
विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही.
सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा.
मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 2, 2023
मानस पगार यांचं बुधवारी रात्री अपघाती निधन झालं. मानस पगार हे राजकारणातील चर्चित चेहरा होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उपोषण केल्याने ते चर्चेत आले होते. नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नाशिकमध्ये चांगले कामही केले होते.
तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी सत्यजित तांबे यांचा प्रचारही केला होता. मात्र, अचानक झालेल्या अपघाताने मानस पगार यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नाशिकवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी चांगलं आव्हान निर्माण केलं होतं. पण त्यांचा पराभव झाला. सत्यजित तांबे हे भरघोस मतांनी विजयी झाले. सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झालाय.