नाशिक | 24 ऑक्टोबर 2023 : शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आज मुंबईत दसरा मेळावे पार पडत आहेत. दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील दसरा मेळावा आझाद मैदान येथे पार पडत आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानावर पार पडत आहे. या दोन्ही मेळाव्यांसाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. राज्यभरातील शेकडो बस गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. असं असताना या उत्साहाला गालबोट लागल्याची घटना घडलीय.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या बसचा इगतपुरीत भीषण अपघात झालाय. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या दोन गाड्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झालाय. एक अपघात इगतपुरीत झालाय. तर दुसरा अपघात हा सांगली जिल्ह्यात झालाय. या अपघातात एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
यवतमाळहून मुंबईला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या खासगी बसला नवीन कसारा घाटात अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात बसमधील 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. नवीन कसारा घाटाच्या वळणावर साईडला बंद पडलेला एक ट्रक उभा होता. त्यामागे छोटा हत्ती येऊन थांबला. यावेळी मागून येणाऱ्या शिंदे गटाच्या बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळी ही बस छोटा हत्तीवर जाऊन आदळली. त्यामुळे हा अपघात घडला.
या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच घोटीच्या महामार्ग पोलीस केंद्र, रूट पेट्रोलिंग टीमचे कर्मचारी तात्काळ घटनास्तळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
सांगलीत देखील आज पहाटे अशाच अपघाताची घटना घडली. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला. अपघातात एक ठार तर तिघे जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळ ही घटना घडली. एका ट्रकने पदाधिकाऱ्याच्या गाडीला मागून धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर तीन जण जखमी झाले. शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे पदाधिकारी असल्याची माहिती मिळत आहे.