‘देशासाठी मन की बात अन् गुजरातसाठी धन की बात’; उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला
"संकटात महाराष्ट्र होरपळून निघत आहे. तोक्ते वादळ महाराष्ट्रावर आदळलं. पण यांनी काही दिलं नाही. महाराष्ट्राला ठेंगा दिला. गुजरातला लाखो दिले. देशाचे पंतप्रधान आहात की महाराष्ट्राचे. देश के लिए मन की बात. गुजरात के लिए धन की बात. का तुम्ही विष पेरत आहेत. गुजरात आमचाही आहे", असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.
नाशिक | 23 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमध्ये जाहीर सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात आले होते. त्यानंतर ते मुंबईत गेले. त्यानंतर त्यांचा पुन्हा सोलापूर दौरा झाला. नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “मोदींच्या वाऱ्या महाराष्ट्रात वाढल्या. दोन चार दिवसांनी येत आहे. आता पोहरादेवीला येत आहेत. या. बघून घ्या महाराष्ट्र. हा महाराष्ट्रच मोदींना धडा शिकवणार आहे. तौक्ते वादळ आलं होतं. महाराष्ट्र संकटात होतं. गारपीट झाली. तेव्हा मोदी आले? आता फक्त मतांसाठी येत आहेत. मणिपूरला गेले नाही. कारण तिकडे फक्त दोन जागा आहेत. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. त्यामुळे येत आहे. निवडणूक आल्यावर महाराष्ट्र आठवतोय”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
‘देशासाठी मन की बात अन् गुजरातसाठी धन की बात’
“संकटात महाराष्ट्र होरपळून निघत आहे. तोक्ते वादळ महाराष्ट्रावर आदळलं. पण यांनी काही दिलं नाही. महाराष्ट्राला ठेंगा दिला. गुजरातला लाखो दिले. देशाचे पंतप्रधान आहात की महाराष्ट्राचे. देश के लिए मन की बात. गुजरात के लिए धन की बात. का तुम्ही विष पेरत आहेत. गुजरात आमचाही आहे. आमच्यामध्येही गुजराती लोक वर्षानुवर्ष राहत आहेत. हिंदू म्हणून राहत आहे. देवळाली, भगूरमध्ये गुजराती आहेत. देशभर आहेत. तुम्ही हिंदूत भेदभाव करत आहात. विष पेरत आहात. ते घातक आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
‘तुम्ही देश आणि गुजरामध्ये भिंत उभी करत आहात’
“९२ च्या दंगलीत उत्तर भारतीय आणि गुजरातींना कुणी वाचवलं होतं. शिवसेनेने वाचवलं होतं. आम्ही भेदभाव केला नाही. कोरोनात मी मुख्यमंत्री होतो. संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. मी कुटुंब वत्सल आहे. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप केला. तेव्हा मी घरंदाजांनी आरोप केला तर मी उत्तर देईन म्हटलं आहे. हा महाराष्ट्र माझ्यासमोर आहे. तेच माझं घराणं आहे. गुजराती माझी माणसं आहे. मराठी तर आहेच. तुम्ही देश आणि गुजरामध्ये भिंत उभी करत आहेत. मोदीजी हे हिंदुत्व मान्य नाही”, असं उद्धव ठाकरे ठणकावून म्हणाले.
“शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. ती गुजरातची म्हणून नव्हे तर ती इंग्रजांची वखार म्हणून लुटली होती. तुम्ही महाराष्ट्र लुटत आहात. महाराष्ट्र ओरबाडता आहात. गुजरात समृद्ध करा. पण महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव ओरबाडत आहात. ते ओरबाडू देणार नाही. त्यासाठी आम्ही लढाईला उभे आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘तुम्ही लढायला तयार आहात ना?’
“तुम्ही लढायला तयार आहात ना? घाबरून जाणार असाल तर आता जा”, असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. “शिवसेनाप्रमुख आपल्याला शिकवून गेले. शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा. आधी गेल्या त्या शेळ्या बस्स झाल्या. शेळ्यांनो निघून जा. मिंध्यांनो निघून जा. नावच मिंधे आहे. मला खरंच आश्चर्य वाटतं हिंदुत्व हिंदुत्व सनातन धर्म नुसतं बोलणाऱ्या भाजपला भ्रष्टाचाऱ्यांना पटवण्यासाठी खोके आहेत. हे कुठलं हिंदुत्व आहे. मध्ये मोर्चे काढले हिंदु जनआक्रोश. आहोत ना आम्ही. आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. तुम्ही सत्तेत असताना हिंदु आक्रोश मोर्चा काढावा लागत असेल तर द्या खुर्ची सोडून”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.