‘कृषीमंत्री सुप्रिया सुळे यांना शिविगाळ करतात, तरीही…’, उद्धव ठाकरे यांची मालेगावात सडकून टीका
"तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला, मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा ५० खोक्याला जात नसेल मग तुमच्या कष्टाला फळ मिळायला हवं", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर निशाणा साधला.
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मालेगावातील सभेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. “राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दिव्यदृष्टी आलेली आहे. काळोखात जाऊन नुकसान बघतात असे दिव्यदृष्टी असलेले आमचे कृषी मंत्री. महिलेला शिवीगाळ करतात आणि तरीही मंत्रिमंडळात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करतात आणि मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसतात हे यांचं हिंदुत्व”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. “शेतकरी आत्महत्येवर हे होतंच असतं असं कृषीमंत्र्यांनी म्हणायचं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“गद्दार, ढेकूंसाठी तोफेची गरजच नसते. आज बऱ्याच वर्षांनी मालेगावत आलेलो आहो. मालेगावकरांना धन्यवाद देतोय. मध्ये जगभरात कोरोना संकट आलं होतं. दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. एक मुंबईतील धारावी आणि दुसरं मालेगाव. रोज रिपोर्ट येत होते. पोलीस बंदोबस्ताला येत ते सगळे कोरोनाग्रस्त. कुणाचा थांगपत्ता लागला नाही. मी मालेगावातील धर्मगुरुंशी बोललो. तुम्ही तेव्हा सहकार्य केलं नसतं तर मालेगाव वाचलं नसतं. मी घरात बसून सांगितलं ते तुम्ही ऐकलं त्यासाठी धन्यवाद मानतो. तुम्ही मला कुटुंबातील एक माणूस मानलं. हे गद्दारांच्या नशिबात असेल असं मला वाटत नाही”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
‘मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही, तर…’
“मलाच कळत नाही आजच्या या सभेचं वर्णन करायचं? पंधरा दिवसांपूर्वी खेडला अतिविराट सभा होती. अभूतपूर्व असं ते दर्शन होतं. आजची सभा अथांग पसरलेली आहे. संजय राऊत आपण जे म्हणात ते बरोबर आहे. आज आपलं नाव, धनुष्यबाण चोरलेलं आहे. माझ्या हातात काही नाही तरीदेखील एवढी गर्दी ही सगळी पूर्वजांची पुण्यायी. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी अद्वय आपण शपथ घेतली. पण मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही तर तुमच्या प्रश्नांसाठी लढायचं. आता एकच जिंकेपर्यंत लढायचं”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
“अद्वय मर्द गढी, तिथून इथे आला आहे. भाऊसाहेब आणि प्रबोधनकारांचा उल्लेख केला. आज त्याचीच गरज आहे. आज दोन शेतकऱ्यांना भेटलो. रतन काका आणि कृष्णा भागवत. तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला, मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा ५० खोक्याला जात नसेल मग तुमच्या कष्टाला फळ मिळायला हवं. शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही नसतं. आसमानी आणि सुलतानी दोन्ही एकत्र आलेलं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“दोन लाखांपर्यंत कर्ज होतं त्याचा लाभ मिळाला होता की नाही ते सांगा. सत्ता आल्यानंतर शेतकरी राजाला कर्जमुकक्ती करायचं हे पहिलं पाऊल होतं. गद्दारी झाली सरकार गेलं. आपलं सरकारला पाच वर्ष होणार होतं त्यादरम्यान टप्प्याटप्प्याने दिलासा देण्याचा विचार करत होतो. पण दुर्देवाने सरकार गेलं. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळायला हवा. शेतकऱ्यांनाकेवळ हमीभाव नाही तर हक्काचा भाव मिळायला हवा. मला उत्तर म्हणून इथे सभा घेणार आहात ना त्याआधी शेतकऱ्यांना उत्तर द्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“कृष्णा डोंगरे यांनी रक्ताने पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत, मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहात. केंद्र सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधात आहे. त्यांच्याविरोधात पेटून उभा. पण बकरी विरोध करणार? मुख्यमंत्री शेतकरी आहेत. दिवाळीवेळी आपण पाहिलं होतं. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. माझा शेतकरी शेतात काम करतो तेव्हा कधी साप, विंचू डसतो. घरात लगीन कार्य असल्यावर शेतकरी शेतात काम करतात”, असंदेखील ते म्हणाले.