श्यामा प्रसाद मुखर्जी तुमचा राजकारणातला बाप… उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल काय?
हे असे असले तरी हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही आजच्यांनी घेतले सारेच ठेके (खोके), पण उद्या त्यांच्या चितेवर, एकही रडणार नाही, या सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी ऐकवून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना धैर्याने लढण्याचा सल्ला दिला. तुम्ही जागरूक आहात. जिवंत आहात. लढायचं कसं हे तुम्हाला सांगायची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 23 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यात त्यांनी शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी थेट भाजपआणि संघावरच हल्लाबोल केला. संघाचा स्वातंत्र्य लढ्यात काहीच सहभाग नव्हता. जेव्हा महात्मा गांधी यांनी छोडो भारत चळवळ सुरू केली, तेव्हा ही चळवळ मोडून काढण्यासाठी भाजपचे राजकारणातले बाप असलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी तेव्हाच्या गव्हर्नरला पत्र दिलं होतं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
स्वातंत्र लढ्यात आरएसएस नव्हती. त्यांनी कुठे भाग घेतला नाही. संघ आणि भाजप आता आयतं स्वातंत्र उपभोगत आहे. काँग्रेस स्वातंत्र्याच्या लढ्यात होती. काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, तुरुंगवास भोगला. या स्वातंत्र्य लढ्यात सावरकर होते. कान्हेरे होते. स्वातंत्र्य लढ्यात लढणारी काँग्रेस नको म्हणून स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करणाऱ्या मुस्लिम लीग बरोबर शामा प्रसाद मुखर्जींनी बंगालमध्ये सरकार स्थापन केलं होतं आणि 11 महिने त्या हकच्या मंत्रिमंडळात श्यामा प्रसाद मुखर्जी म्हणजे तुमचा बाप राजकारणातला होता. त्यांच्याबद्दल बोला, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी संघ आणि भाजपला दिलं.
नुसतं जय श्रीराम बोलू नका, तसं वागा
तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता? आधी तुमची जन्म कुंडली मांडा. तुमच्या पत्रिकेत राहू केतू आले असतील आम्ही काय करू त्याला? तुमच्याकडे चांगला गुरू नाही. हा आमचा दोष नाही. हे सर्व पाहिल्यावर यांची लायकी काय ते कळते. मलाही थोडा पश्चात्ताप होतो. त्यावेळी हिंदुत्व म्हणून ते आणि आपण भगव्यासाठी एकत्र झालो होतो. त्या भगव्यात भेद करणारे हे नालायक आहेत. ही सर्व विचारांची झालेली वाताहत पाहिल्यावर लोकांनी यांना गारठून टाकलंय. नुसतं जय श्रीराम, जय श्रीराम सुरू आहे. फक्त जय श्रीराम बोलू नका, जय श्रीराम बोलत असाल तर रामासारखं वागा, असा टोला त्यांनी लगावला.
लबाडांचा बुरखा फाडलाच पाहिजे
औरंगजेब म्हणाला, मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. इथे तर गवतालाही भाले फुटतात. आता गरज पुढच्या वाक्याची आहे. जे भाजप करत आहे, या महाराष्ट्रात खडकावरही रूईचं बीज फेकलं तर ते एवढं माजतं ते हाहा म्हणता दौलत नष्ट करतं. तोडाफोडा राज्य करा ही ब्रिटीशांची निती भाजपचं धोरण झालंय. शामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लीम लीग बरोबर सरकार स्थापन केलं. त्यावेळी चलेजाव चळवळ होती. महात्मा गांधींची.
पश्चिमबंगालमध्ये ही चळवळ कशी चिरडली पाहिजे याचं पत्र गांधींनी तेव्हाच्या गर्व्हर्नरला दिलं होतं. त्यामुळे स्वातंत्र्य काय आम्हाला शिकवू नका. हिंदुत्व काय शिकवू नका. आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. रामाचे भक्त आहोत. भवानी मातेचे भक्त आहोत. आता तुम्हाला या लबाडांचा बुरखा फाडला पाहिजे, असं आवाहनच त्यांनी केलं.