लग्न जमवण्याचं आमदारांच्या हातात असतं तर अर्ध्या.., नाशिकमध्ये मुनगंटीवारांची जोरदार फटकेबाजी
नाशिकमध्ये भगवान महावीर जनकल्याण सोहळा आणि महावीर जयंती निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चौफेर फटकेबाजी केली,

नाशिकमध्ये भगवान महावीर जनकल्याण सोहळा आणि महावीर जयंती निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चौफेर फटकेबाजी केली, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अनुभव आणि किस्से या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?
मी कधी तरी कॉलेजमध्ये असताना म्हणायचो कोशिश करणे वालो की कभी हार नही होती. मी चंद्रपूरवरून या व्याख्यान मालेसाठी नाशिकला इतक्या दूर आलो आहे. जे दडपन होतं ते कमी झालं आहे. आयोजक म्हणाले जो इथे येतो त्यांचं प्रमोशन होतं, फडणवीस मुख्यमंत्री झाले. 1995 मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो, निवडणूक झाल्यावर मी एम फील पास झालो.
एकदा मी आमदार निवासातून बाहेर आलो, टॅक्सीत बसलो, टॅक्सीवाल्याला माहीत नव्हतं मी आमदार आहे म्हणून, तो मला म्हणाला एक दिवस या आमदार निवसावर बॉम्ब टाकला पाहिजे, तेव्हा मला कळालं या भवनाबद्दल लोकांच्या मनात किती द्वेष आहे ते. आमदारांच्या हातात लग्न लाऊन देण्याचे असते तर अर्ध्या आमदारांचे हिरोईन सोबत लग्न झाले असते, असा मिष्कील टोला यावेळी मुनगंटीवार यांनी लगावला.
पुढे बोलताना त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला ते म्हणाले की, महात्मा गांधी जयंती निमित्त दारूबंदी सप्ताह पाळला पाहिजे, असं आमचं ठरलं. तेव्हा एक सदस्य म्हणाला कशाला करता, करायचाच असेल तर महात्मा गांधी यांच्या जयंती ऐवजी मोरारजी देसाई यांच्या जन्म दिवसाला करा, कारण त्यांचा जन्म 29 फेब्रुवारीला झाला आहे, त्यामुळे चार वर्षांमधून एकदाच दारू बंदी सप्ताह येईल.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्रणिती शिंदे आणि अरविंद सावंत यांना देखील खोचक टोला लगावला आहे. मी आज राजकारणावर बोललो नाही, मात्र उद्या आणि परवा ज्यांचं व्याख्यान आहे ते राजकारणावर बोलतील, पण त्याआधी मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा, एक जन पत्नीला ऐकायला येत नाही म्हणून डॉक्टरांकडे घेऊन गेला. जेवढ्या अंतरावरून ऐकू येईल तेवढ्या प्रमाणात औषधांची मात्र द्यायचा सल्ला त्याला डॉक्टरांनी दिला. तो घरी गेला, वेगवेगळ्या अंतरावरून त्याने बायकोला प्रश्न विचारले, तेव्हा त्याला कळालं बायकोचा प्रॉब्लेमच नव्हता, त्यालाच ऐकायला येत नव्हतं, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.