शिंदे गटात धुसफुसीची चर्चा, मुख्यमंत्री आणि सुहास कांदे यांच्यात बंद दाराआड बैठक, नेमकं काय सुरुय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफुसीच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत.
नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपांप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. तर राज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सुरुय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाच्या विरोधातील याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळल्याची घटना ताजी आहे. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातही नाराजी नाट्य सुरु असल्याच्या चर्चा आहेत. विशेष म्हणजे या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची देखील माहिती समोर आलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफुसीच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आमदार संजय शिरसाठ यांच्या नाराजीची बातमी समोर आली. पण दोन्ही नेत्यांनी याबाबतच्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलंय. आपण नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या नाराजीच्या चर्चांना विराम मिळत असतानाच शिंदे गटाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या नाराजीचा प्रकार समोर आलाय. त्यांचीदेखील नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आलीय.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आपल्याला बैठकांना बोलवत नाहीत. आपल्याला न विचारता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, अशी खदखद व्यक्त करत सुहास कांदे यांनी आपली उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या नाराजीनंतर शिंदे गटात धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची दखल घेतल्याची माहिती मिळालीय. कारण आज तशा घडामोडी घडल्या आहेत.
सुहास कांदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट झालीय. या भेटीत मुख्यमंत्री आणि कांदे यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, या विषयीची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे. पण या बैठकीत कांदे यांनी पालकमंत्री आपल्याला बैठकांना बोलवत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर ठाकरे गटात काही बदल होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर सुहास कांदे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता “सगळ्यांसोबत माझी बैठक झाली. राज्यपाल यांनाही भेटलो. मला आता काहीही बोलायचे नाही. जेव्हा बोलायचे तेव्हा आपल्याला बोलवेल”, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी माध्यमांना बंद दाराआड झालेल्या चर्चेची माहिती देण्यास टाळाटाळ केली.