नाशिक: राष्ट्रवादीने काँग्रेसच्या (congress) पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला होता. याकडे पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं लक्ष वेधलं असता सुप्रिया सुळे यांनी अत्यंत मिश्किल उत्तर दिलं. तुमचं लग्न झालं आहे का? भांड्याला भांडं लागतंच. सगळं थोडीच गुळगुळीत असतं. आमचं भांडण देखील घरातच असतं. शेवटी आपण ज्याच्याकडून अपेक्षा करतो, त्याच्याशीच भांडतो. त्यांनी त्यांचं म्हणणं शरद पवार यांच्याकडे मांडलं पाहिजे. कारण त्यांच्या अपेक्षा पवार साहेबांकडूनच आहेत. सगळेजण आमच्या संसाराबाबत डाऊट घेत आहेत, असं मिश्लिक उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं. सुप्रिया सुळे या नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वादावर भाष्य केलं. तसेच हा वाद म्हणजे पेल्यातील वादळ असल्याचं भासवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. यावेळी अभिनेत्री केतकी चितळेलाही त्यांनी फटकारलं.
एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला. त्यावर बोलण्यास सुप्रिया सुळे यांनी नकार दिला. मी या गोष्टींचा इतका विचार करत नाही. मला माझ्या मतदारसंघात खूप कामं आहेत. महागाई, सिलेंडर यापेक्षा मला काही महत्वाचं वाटत नाही. सुषमा जी म्हटल्या होत्या, आकडोंसे पेट नही भरता. पंतप्रधानांना विनंती आहे की, सर्व पक्षीयांची बैठक बोलावून महागाईवर काय करू शकतो यावर चर्चा करायला हवी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
केतकी चितळेच्या पोस्टवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहीतरी लिहिलं आहे. कुठल्याच कायद्यात हे बसत नाही. हे खूप दुर्दैवी आहे. न्यायालय त्यांच काम करेलय राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा समर्थन नाही. कोणाच्याही वडिलांनी मरावं अस बोलणं कोणत्या संस्कृतीत बसतं? हा संस्कृतीचा भाग आहे. या पोस्टवर निषेध व्यक्त केल्याबद्दल देवेंद्रजी, उद्धवजी आणि राज ठाकरे यांचे जाहीर आभार. अशी वेळ दुसऱ्या कोणावर आली तर मी देखील तुमच्या सोबत उभी राहील, असं त्या म्हणाल्या.
मिटकरी यांना देख नोटीस आली आहे. देशात एक यंत्रणा आहे, पोलीस स्टेशन आणि कोर्ट आहेत. माध्यमाचा गैर वापर करणं हास्यास्पद आहे. मी भान ठेवून वागते. माझ्यावर मराठी मध्यमवर्गीय संस्कृतीचे संस्कार आहेत. 55 वर्ष हल्ले होऊन देखील माझ्या वडिलांनी पण कोणाला अस उत्तर दिलं नाही, ही आमची संस्कृती आहे. मला त्याचा अभिमान आहे, असंही त्या म्हणाल्या.