कसारा घाटात भीषण अपघात, टँकर 300 फूट खाली दरीत कोसळला, 5 जणांचा जागीच मृत्यू
नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटत भीषण अपघाताची घटना घडली आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेला जाणारा दुधाचा टँकर तब्बल 300 फूट खोल दरीत कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात भीषण अपघात घडला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेला जाणारा दुधाचा टँकर थेट दरीत कोसळला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे इगतपुरीत खळबळ उडाली आहे. टँकर चालकाचा ताबा सुटल्याने ही अपघाताची घटना घडली. नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंट जवळ ही अपघाताची घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्याने टँकर तब्बल 300 फूट खोल दरीत कोसळला.
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकानेन दोरीच्या साहाय्याने खाली उतरत 4 गंभीर जखमींना दरीतून बाहेर काढले आहे. अजूनही तीन ते चार जण दरीत अडकल्याचा अंदाज आहे. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येतोय. जखमींना इगतपुरी आणि कसारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कसारा घाटात अपघात घडल्याची ही पहिली घटना नाही. या घाटात अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कसारा घाटात ये-जा करणारा एकच मार्ग होता. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी व्हायची. याशिवाय अपघाताच्या घटनादेखील मोठ्या प्रमाणात व्हायच्या. पण आता नवा रस्ता देखील सुरु आहे. त्यामुळे कसारा घाटातून प्रवास करणं आता त्यामानाने खूप सोयीस्कर झालं आहे. पण बऱ्याचदा घाटात अपघाताच्या घटना घडतात. काही वेळेला घाटात रस्ता वळण घेत असताना भरधाव गाडी नेल्यामुळे अपघाताची घटना घडते. तर काही वेळेला ब्रेक फेल झाल्यामुळे अपघाताचा घटना घडतात. अनेकदा चालकाचा ताबा सुटल्याने अपघाताच्या घटना घडतात. या घटनांमुळे जीवितहानी देखील होते. त्यामुळे वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करुन, आपल्यासह इतरांच्याही जीवाची पर्वा करुन गाडी चालवणं आवश्यक आहे.