मित्रांसाठी बिबट्याशी झुंज, दहावीच्या विद्यार्थ्याने असे वाचवले प्राण
इगतपुरीत इयत्ता दहावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या योगेश रामचंद्र पथवे या विद्यार्थ्याने केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. योगेश आणि त्याच्या मित्रांवर शाळेत जात असताना बिबट्याने हल्ला केला. यावेळी योगशने प्रसंगावधान साधून आपल्या मित्रांचे प्राण वाचवले.
शैलेश पुरोहित, Tv9 मराठी, नाशिक | 27 जानेवारी 2024 : इगतपुरीत दहावीच्या विद्यार्थ्यांवर बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी एका विद्यार्थ्याने दाखवलेल्या धाडसाचं संपूर्ण इगतपुरीत कौतुक होत आहे. मित्रावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर एक दहावी इयत्तेतला विद्यार्थी कोणताही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी पुढे धावला. त्याने आपल्या मित्राला बाजूला केलं आणि थेट बिबट्याशी झुंज सुरु केली. यावेळी बिबट्या आणि या विद्यार्थ्यामध्ये काही क्षण झटापटी झाली. पण त्याचा प्रतिकार आणि मुलांची आरडाओरड बघून बिबट्या घाबरला आणि तो जंगलाच्या पळून गेला. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही इगतपुरीत घडली आहे.
नेमकं काय घडलं?
इगतपुरी तालुक्यातील धारणोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. योगेश रामचंद्र पथवे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत शाळेत जात होता. त्याचे तीन मित्र प्रविण, निलेश, सुरेश हे घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. योगेशने प्रसंगावधान राखत मित्रांना बाजूला ढकलून देत बिबट्याशी झुंज देत त्याचा हल्ला परतवून लावला. मात्र यात तो जखमी झाला.
वारंवार प्रतिकार केल्याने आणि मित्रांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. पण या हल्ल्यात योगशे जखमी झाला. जखमी योगेशला मित्रांनी पुढील उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सामाजिक कार्यकर्ते सिताराम गावंडा यांनी परिसरात पिंजरा लावण्याची आणि जखमी विद्यार्थ्यास मदतीची मागणी केली आहे.