ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका, पोलिसांनी बड्या नेत्याला भोपाळमधून ताब्यात घेतलं
शिवसेना ठाकरे गटाला मालेगावात मोठा झटका बसला आहे. कारण ठाकरे गटाचे मालेगावातील बडे नेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिक पोलिसांनी अद्वय यांना थेट भोपाळमधून ताब्यात घेतलं आहे. त्यांना नाशिक किंवा मालेगावात आणलं जात आहे. तसेच त्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. अद्वय हिरे यांच्यावर अनेक कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
चंदन पुजाधिकारी, Tv9 मराठी, नाशिक | 15 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे मालेगावातील मोठे नेते अद्वय हिरे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे नाशिक पोलिसांनी भोपाळमधून अद्वय हिरे यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. एनडीसीसी बँक आणि शिक्षण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अद्वय हिरे आणि हिरे परिवारातील इतर सदस्यांवरही गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर अद्वय हिरेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध रंगलेलं होतं. विशेष म्हणजे खासदार संजय राऊत विरुद्ध दादा भुसे असं चित्र असताना, मालेगावचे अद्वय हिरे यांनीदेखील दादा भुसे यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं होतं. त्यानंतर अद्वय हिरे आणि त्यांच्या परिवारावर सूडबुद्धिने कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात होता. विशेष म्हणजे आता अद्वय हिरे यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मालेगावच्या रेणुका सूत गिरणीला मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात आलं होतं. अद्वय हिरे ज्यावेळेला संचालक होते त्याचवेळेला हे कर्ज देण्यात आलं होतं. अपहार मोठ्या प्रमाणात झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर अद्वय हिरे आणि त्यांच्या हिरे परिवाराच्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या सगळ्या प्रकरणावर नोटीस बजावण्यात आली होती.
अद्विय हिरे फरार होते. ते पोलिसांना सापडत नव्हते. त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी अद्वय हिरे यांना भोपाळमधून ताब्यात घेतलं आहे. त्यांना नाशिक किंवा मालेगावमध्ये आणलं जाईल. त्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल. पण या संपूर्ण प्रकरणात अद्वय हिरे आणि हिरे कुटुंबिय अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अद्वय हिरे यांच्यावर नेमका आरोप काय?
- अद्वय हिरे यांना NDCC बँक घोटाळा आणि शिक्षण संस्थेतील अपहार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
- या प्रकरणी 31 कोटी 40 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
- यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस कागदपत्रे दाखवून कर्ज घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
- अद्वय हिरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- काही महिन्यांपूर्वी मालेगावच्या रमजानपुरा पोलीस ठाण्यात अद्वय हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.