नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणारच; नोव्हेंबरच्या तारखांची चाचपणी
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे पुढे ढकलेले गेलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असून, त्यासाठी नोव्हेंबरच्या तारखांची चाचपणी करण्यात येत आहे.
नाशिकः कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे पुढे ढकलेले गेलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असून, त्यासाठी नोव्हेंबरच्या तारखांची चाचपणी करण्यात येत आहे.
मार्च महिन्यातल्या 26 ते 28 मार्चच्या दरम्यान हे साहित्य संमेलन होणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या होत्या. त्या संबंधितांपर्यंत पोहचल्याही होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. जुलै महिन्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील यांनी पालकमंत्री छगन भुजबळांना पत्र पाठवले होते. त्यात जुलै महिन्यात साहित्य संमेलना भरवणे शक्य आहे का, अशी विचारणा केली होती. मात्र, त्यावेळेसही त्यांना नकार कळवण्यात आला होता. मात्र, आता दसऱ्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आढावा घेऊन दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. सध्या नोव्हेंबर महिन्यातील 19, 20, 21 या तीन तारखांचा विचार आयोजकांकडून सुरू आहे. मात्र, कोरोना रुग्णांचा आढावा घेऊन आणि त्यावेळची परिस्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
पुन्हा वाढतायत रुग्ण
कोरोनाची दुसरी लाट ओसरली. तिसरी लाट तूर्तास तरी येण्याची शक्यता नाही, असे मानून राज्य सरकारने चार ऑक्टोबरपासून शाळा सुरू केल्या. विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत स्वागत करण्यात आले. मात्र, सिन्नर तालुक्यातील रुग्णवाढ थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पांगरी येथील शाळा बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आहे. सोबतच संत हरिबाबा विद्यालय येत्या अकरा ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पांगरीत सध्या कोरोनाचे 18 रुग्ण सक्रिय आहेत. सध्या जिल्ह्यात सिन्नर, निफाड, येवल्यात तालुक्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. येथे रुग्ण वाढणे कमी झाले नाही, तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. तसेच या शहरातील हॉटस्पॉट शोधून चाचण्या वाढवा. तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करा. कठोर निर्बंध लावण्याची वेळ आणू नका, असा इशाही भुजबळांनी दिला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर खरेच साहित्य संमेलन होईल का, हे सांगणे तूर्तास तरी अवघड आहे.
नगरच्या रुग्णांची भीती
अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर आणि नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र, यामुळे नाशिकरांची चिंता वाढली आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे.
इतर बातम्याः
कोरोना रुग्णांमुळे पांगरीची शाळा बंद; सिन्नर, निफाड, येवल्यालात कडक निर्बंध लावण्याचा इशारा
कोरोना रुग्णांमुळे पांगरीची शाळा बंद; सिन्नर, निफाड, येवल्यालात कडक निर्बंध लावण्याचा इशाराhttps://t.co/P8Tv8vRBaA#Corona|#Nashik|#Yeola|#Sinnar|#Niphad|#schoolsclosed|#warningofstrictrestrictions
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021