एसटी बसच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, खासगी हॉटेलवरती थांबा घेतल्यामुळे प्रवासी संतप्त
एसटी महामंडळाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एसटीचे कर्मचारी ठरवून दिलेल्या थांब्यावर गाडी थांबवत नसल्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे.
वसंत पानसरे, शहापूर, ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर (nashik mumbai highway) शहापूरमधून मुंबईकडून नाशिककडे किवां नाशिकवरुन मुबंईकडे एसटी महामंडळाच्या (ST Bus) अनेक बसेस धावत असतात. यामधून सर्वसामान्य शेकडो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांसाठी महामार्गावर एस.टी. महामंडळाने अनेक हॉटेल निश्चित केली आहेत. तेथे एसटीच्या प्रवाशांना इतर हॉटेलापेक्षा खाद्यपदार्थाचे दर हे कमी असतात. माञ बहुतेक एसटीचे चालक व वाहक त्यांच्या फायद्यासाठी महामंडळाने निश्चित केलेल्या हॉटेलात न थांबता खासगी हॉटेलात थांबतात. त्यामुळे त्या ठिकाणी प्रवाशांना नाईलाजास्तव खाद्यपदार्थासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. यामुळे एसटीने (st news thane nashik) प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत असून प्रवाशांची लूट होत असल्याचे उजेडात आले आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा भागातील खाजगी हॉटेल हायवे फेमस या ठिकाणी अशाच प्रकारे एसटी महामंडळाच्या दिवसभर १०० ते १२५ बसेस निश्चित थांबा नसताना देखील थांबत असतात. यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुंदड सहन करावा लागतो.
चालक-वाहकांना खाजगी हॉटेलात जेवण, नाश्टा, चहापाणी फुकट असतं, तसेच हॉटेल मालक त्यांना पाचशे ते हजार रूपये देत असल्याने प्रवाशांनी भरलेली बस ते निश्चित केलेल्या ठिकाणी न थांबवता खासगी हॉटेलात थांबवतात. याची कल्पना प्रवाशांना नसल्यामुळे निश्चित केलेल्या हॉटेलात नाष्ट्यासाठी जे ३० रुपये लागतात. तेच खासगी हॉटेलात 70 ते 80 रुपये मोजावे लागत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
तसेच काही प्रवासी नाईलाजाने खासगी हॉटेलात जास्तीचा बिल देऊन खातात, तर काहींना परवड नसल्यामुळे ते नाष्टा किवां जेवण करायच टाळतात अशी देखील प्रतिक्रिया काही महिला प्रवाशांनी दिली आहे.
एसटीच्या प्रवाशांची खासगी हॉटेलात होणारी आर्थिक लूट कुठेतरी प्रशासनाने थांबविली पाहिजे अशी मागणी देखील काही प्रवासी करताना दिसत आहेत.